एबी फॉर्म कोणाला मिळणार ? प्रचंड उत्सुकता
सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करायला केवळ अवघ्या 4 दिवसांचा अवधी शिल्लक असतानाही महायुतीने अद्याप आपला अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेतून इच्छुक उमेदवार किरण सामंत यांनी आज 15 एप्रिल रोजी स्वतःसाठी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून घेऊन मोठी खळबळ उडवून दिली आहे.भाजपा नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी याआधीच आपण खासदारकी लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगत मतदारसंघात मेळावे घेत स्वतःसाठी कमळ निशाणीवर मतदान करण्यासाठी कार्यकर्त्याना चार्ज केले आहे. तर दुसरीकडे शिंदे शिवसेनेतून किरण सामंत यांनीही मेळावे घेण्याऐवजी थेट मतदारांसशी संपर्क साधत आपण महायुती कडून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगत स्वतःसाठी मतदानाचे आवाहन करायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर अत्यंत नाट्यमय घडामोडी तळकोकणाच्या राजकीय पटलावर घडत असून काल 14 एप्रिल रोजी शिंदे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांनी प्रायव्हेट विमानाने थेट नागपूर गाठत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पक्षाची दावेदारी कायम ठेवत धनुष्यबाण निशाणीचा आग्रह धरत रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस कडून महायुतीचा शिवसेनेचाच उमेदवार असेल असे संकेत दिले. त्यातच किरण सामंत यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणूक विभागातून अर्ज घेतल्याने उद्योगमंत्री नारायण राणे की किरण सामंत महायुती चा उमेदवार असणार याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.












