टाकाऊ वस्तूंचा उपयोग करत विद्यार्थ्यांनी बनवले पक्षांसाठी घरटे !

वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या विद्यार्थ्यांनचा उपक्रम

वार्षिक परीक्षा संपल्यानंतर मिळणाऱ्या सुट्टीचा सदुपयोग

आचरा (प्रतिनिधी) : जागतिक तापमानात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. आणि याचा प्रभाव निसर्गातील प्रत्येक घटकावर पडत आहे. निवारा पाण्याअभावी अनेक पशुपक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. मनुष्यप्राण्या इतकाच प्रत्येक सजीवाचा या वसुंधरेवर तेवढाच अधिकार आहे. मनुष्य मात्र आपल्या हव्यासापोटी या वसुंधरेचे प्रचंड नुकसान करीत आहे.

या निसर्गाचे जतन करण्याचे संस्कार जर आपल्या मुलांना आपण दिले, या कार्यात आपण सहभागी झालो तर खऱ्या अर्थाने आपण वसुंधरा दिन साजरा करू शकतो. आपल्या आजूबाजूच्या पक्षांना निवारा व पाणी मिळावे यासाठी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंचा उपयोग करत पक्षांसाठी छानसे घरटे बनवले. हे घरटे विद्यार्थ्यांनी आपल्या घरी झाडावर लटकवत त्यात पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केली. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर मिळणाऱ्या सुट्टीचा सदुपयोग करत विद्यार्थ्यांनी हा उपक्रम पूर्णत्वास नेला. यासाठी कलाशिक्षक समीर चांदरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष शेखर पेणकर, आनंद वराडकर सचिव सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, सर्व संचालक मंडळ, वराडकर हायस्कूल कट्टाचे मुख्याध्यापक संजय नाईक यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले ! मुलांच्या या उपक्रमाचे परिसरातील ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!