आचरा (प्रतिनिधी) : आनंदयात्री ज्यांच्या गालावरती सुंदर हास्याची खळी उमटायची. स्वतः हसायचे आणि रसिकांना देखील खळखळून हसायला भाग पाडायचे असे जेष्ठ कवी, सुप्रसिद्ध गझलकार स्व.मधुसूदन नानिवडेकर यांचा आज तिसरा स्मृती दिन. तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवार, संवाद परिवार आणि निसर्ग मित्र परिवार या तिन्ही संस्थामध्ये त्याचा सदैव सक्रिय सहभाग राहिला होता. त्यामुळे त्यांचा नेहमीच सहवास लाभत होता. त्यांच्या पश्चात नानिवडेकर यांची चिरंतन स्मृती जपली जावी म्हणून दरवर्षी स्मृती दिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात येतो. त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आज सायंकाळी ठीक ५ वाजता तळेरे येथील मधुकट्टयावरती त्यांना अभिवादन करून श्रध्दांजली वाहण्यात येईल.
त्यानंतर त्यांची कायमस्वरूपी आठवण रहावी म्हणून सावली देणाऱ्या वृक्षांचे वृक्षारोपण तळेरे एसटी बस स्थानक परिसरात करण्यात येणार आहे. तरी आज गुरुवार दि.११ जुलै २०२४ रोजी ठीक सायंकाळी ५.०० वाजता डॉ.मिलिंद कुलकर्णी यांच्या चैतन्य नर्सिंग होमच्या प्रांगणातील मधुकट्टयावरती सर्व नानिवडेकर प्रेमी तसेच संवाद परिवार, तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवार आणि निसर्ग मित्र परिवार या संस्थाच्या सर्व पदाधिकारी व सभासदांनी एकत्रितपणे जमा होऊन सहभागी व्हावे, असे आवाहन उपरोक्त संस्थाच्या वतीने करण्यात आले आहे.












