नियम समजून घेऊन, चुकीचे काम करू नका, डिस्काउंट व अनहेल्दी कॉम्पिटिशन टाळा – सिंधू जिल्हा प्र. सहा.आयुक्त अरुण गोडसे

जिल्हा केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन, अन्न आणि औषध प्रशा. आणि तालुका असोसिएशन द्वारे संवाद सभेला कणकवलीतून प्रारंभ !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : रुग्णांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून, जागरूकतेने अपडेट राहत, कायद्याच्या चाकोरीत, फार्मासिस्ट आणि औषध व्यावसायिकांनी व्यापार- उदीम केल्यास प्रशासकीय कारवाईतून मुक्तता मिळू शकते. असे मार्गदर्शनपर उद्गार सिंधू. जिल्हाचे प्र.सहा.आयुक्त तथा औषध निरीक्षक अरुण गोडसे यांनी, अन्न आणि प्रशासन सिंधू. जिल्हा व केमिस्ट तालुका असोसिएशन आयोजित संवाद सभेमध्ये काढले.प्र.आयुक्त यांच्या जिल्ह्यातील नियुक्ती वर्धापनदिनी आणि सर्वप्रथम कणकवली तालुक्यातून संवाद सभेची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर त्यांचेसह जिल्हाध्यक्ष आनंद रासम, सचिव संजय सावंत, सहसचिव काशिनाथ तारी, खजिनदार विवेक आपटे, तालुकाध्यक्ष संजय घाडीगावकर तसेच नंदू उबाळे, अमर गावडे, श्रीराम गावडे इ, विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि स्वागत कुमार नाडकर्णी यांनी केले. प्र .सहा आयुक्त गोडसे यांचे पुष्पगुच्छ देऊन, तालुकाध्यक्ष घाडीगावकर आणि कणकवली तालुक्यातील महिला फार्मासिस्ट नी स्वागत केले.

आपल्या प्रास्ताविकात आनंद रासम यांनी संवाद सभेचा उद्देश सांगताना, प्रशासनाचे अधिकारी,त्यांची कार्यपद्धती आणि तालुक्यातील दुकानदार व फार्मसिस्ट यांचा परस्पर सुसंवाद व्हावा, ओळख व्हावी आणि अडीअडचणीचा उहापोह होऊन, रुग्ण व प्रशासन आणि आरोग्यसेवा यामधील दुवा विश्वासार्ह व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांनी संघटनेमार्फत चालू असलेल्या डिस्काउंट, क्रेडिट नोट, ऑनलाईन औषध वितरण इत्यादी बाबींना स्पर्श करत कौन्सिलिंग कोर्सच्या आयोजनाची माहिती दिली…

यावेळी विस्तृत मार्गदर्शन करताना, प्र. सहा.आयुक्तांनी कणकवली तालुक्यातील फार्मासिस्ट- दुकानदार सजग असून जाणून-बुजून चुका करीत नाहीत. अनवधानाने होणाऱ्या उल्लंघना कडे लक्ष देणे आवश्यक आहे. राज्यात पाच क्रमांकापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. तो टिकवण्याची सर्वांची जबाबदारी असून, त्याकरिता मी तुमच्यासाठी सदैव उपलब्ध असेन. यावेळी त्यांनी आपल्या परभणी, हिंगोली, सातारा, मुंबई येथील सेवा काळातील उदाहरणे देऊन, कायदा सर्वांसाठी समान असून, चुकीला माफी नाही. शिक्षा ही होणारच. त्यामुळे प्रलोभनाला बळी न पडता, योग्य कागदपत्राचे जतन करून, व्यवसाय करताना आळस – बेपर्वाई कडे दुर्लक्ष करावे. जागृकता पाळावी. नॉर्कॉटिक्स ड्रग्स, औषधांची साठवणूक, मुदतबाह्य औषधे, ओव्हर चार्जेस, सेल- परचेस बिल्स, तपासणी पुस्तक ,अप्रमाणिक औषधांचा साठा, डॉक्टर डिस्पेन्सिंग, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि दुकानात रजिस्टर फार्मासिस्ट ची उपस्थिती याबाबत सुधारित नियम, तपासणी वेळी येणारे प्रसंग, यांना स्पर्श करत सर्वांनी नियम समजून घेऊन चुकीचे काम करू नका. आणि डिस्काउंट व अनहेल्दी कॉम्पिटिशन करू नका,असा आग्रही सल्ला दिला.

यानंतर झालेल्या चर्चा सत्रात उपस्थित फार्मासिस्ट-व्यावसायिकांनी भाग घेऊन शंका समाधान करून घेतले. जिल्हा सचिव संजय सावंत यांनी शेवटी आभार प्रदर्शन केले.

error: Content is protected !!