पोक्सोसह गँगरेप गुन्ह्यात आरोपी विलास गावित चा जामीन दुसऱ्यांदा फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद

ओरोस (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर गँगरेप केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी विलास लक्ष्मण गावित (वय 28, रा पेंढरी, तानसा, शहापूर, जि. ठाणे) याचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी फेटाळला. याकामी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर संदीप उर्फ सानु रामसुकन्या परेल (वय 25, रा.महाराळगाव कल्याण जि ठाणे) विलास लक्षण गावित, आशिष काळूराम कंठे, विकी उर्फ विकास लक्षण गावित या चौघांनी आळीपाळीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. ही घटना 21 फेब्रुवारी 2023 ते 2 मार्च 2023 दरम्यान घडली. वरील सर्व आरोपीनी तीच्यावर तंत्र मंत्र उच्चारून अंगावर पावडर पसरून जादूटोणा करत अल्पवयीन पीडिता ही त्यांची प्रेयसी असल्याचे सांगितले. तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. वडिलांना फोन करायला लावून त्यांच्याकडून 10 हजार रुपये मागून घेण्यास सांगितले. तसेच तिच्या अपहरणाची फिर्याद मागे घ्या असे सांगायला सांगितले. अन्यथा चुलत भावाला मारण्याची धमकीही दिली. वरील सर्व आरोपींना मालवण पोलिसांनी 4 मार्च 2023 रोजी रात्री पावणे दहा वाजता अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी विलास गावित याने दाखल केलेल्या जामीन अर्जाला सरकारी वकील रुपेश देसाई यांनी हरकत घेतली. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी आरोपी विलास गावित याने केलेला पोक्सो चा गुन्हा हा अति संवेदनशील आणि गंभीर आहे, आरोपीने पीडितेवर बलात्कार केला आहे, मित्रांसह आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे, पीडिता अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही क्रूरपणे आरोपीने तिच्यावर लैगिक अत्याचार करून जादूटोणाही केला, आरोपीला जामीन मिळल्यास तो पीडिता आणि साक्षीदार याना धमकावून दबाव टाकू शकतो, आरोपी हा परजिल्ह्यातील असल्याने जामीन मिळाल्यानंतर खटल्याच्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे आदी मुद्दे मांडले. सरकारी वकील देसाई यांच्या यशस्वी युक्तिवादानंतर जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी आरोपी विलास लक्ष्मण गावितचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला.

error: Content is protected !!