कणकवली (प्रतिनिधी) : रिक्षासाठी थांबलेल्या प्रवाशाचे रिक्षातून अपहरण करून त्याला नजरकैदेत ठेऊन त्यांच्या एटीएममधील पैसे काढून घेतले. तसेच त्याला मारहाण केल्याप्रकरणी कलमठ मुस्लीमवाडी येथील आरोपी अल्ताफ जमिल अत्तार याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला आहे. आरोपीच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
२५ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास तक्रारदार धीरेंद्रकुमार यादव (मुळ रा. उत्तरप्रदेश, सध्या समर्थनगर कणकवली) याने कणकवलीतील पटवर्धन चौकात घरी जाण्यासाठी रिक्षा भाडयाने केली. यावेळी रिक्षातील दोन अनोळखी इसमानी त्याला घरच्या पत्त्यावर न नेता त्याला मारहाण करत त्याच्याकडील मोबाईल व रोख रक्कम व एटीएम कार्ड काढून घेतले. तसेच त्याचे अपहरण करून त्याला कुडाळ येथे नेले व त्याच्या एटीएम खात्यातून कुडाळ स्टेटबँक येथे १८ हजार रुपये काढले. त्यानंतर त्याला गोवा हद्दीपर्यंत नेऊन पुन्हा परत आणून कुडाळ बस स्थानकावर सोडून दिले. एटीएममधील सीसीटीव्हीमुळे आरोपी निष्पन्न झाले होते.
याबाबत कणकवली पोलीस स्थानकात २८ डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींवर भादंवि कलम ३६४ अ. ३६५, ३६८ ३९४, ५०४, ५०६ सह २४अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला २८ डिसेंबर रोजी अटक केली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपी न्यायालयीन कोठडीत होता. आरोपीच्यावतीने जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर झालेल्या सुनावणीअंती न्यायालयाने ५० हजार रुपयांचा जामिन मंजूर करताना सरकारी पक्षाच्या पुराव्यात अडथळा करू नये, अशाप्रकारचा गुन्हा पुन्हा करू नये, अशा अटी घातल्या आहेत.