कणकवली (प्रतिनिधी) : शनिवार, दि. १३ जुलै, २०२४ कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्टस्, कळसुली प्रशालेमध्ये शालेय स्वराज्य सभेची निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली. भारत हा लोकशाहीप्रधान देश आणि निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव. लोकशाहीत निवडणुकीचा प्रत्यक्ष अनुभव यावा याच धरतीवर प्रशालेमध्ये शालेय स्वराज्य सभेची निवडणूक दरवर्षी होत असते. इयत्ता पाचवी ते सातवी प्राथमिक, इयत्ता आठवी ते दहावी माध्यमिक आणि इयत्ता अकरावी ते बारावी उच्च माध्यमिक या तीन गटांमधून सदस्य पदासाठी तर संपूर्ण शाळेतून मुख्यमंत्रीपदासाठी गुप्त मतदान पद्धतीने ही निवडणूक होते. निवडून आलेल्या या विद्यार्थी प्रतिनिधीमधून मंत्रिमंडळ स्थापन केले जाते. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, उपसांस्कृतिक मंत्री, क्रीडामंत्री, शिस्त मंत्री, हस्तलिखित मंत्री, वाचनालय मंत्री, सहल मंत्री, स्वच्छता व सजावट मंत्री असे खातेवाटप केले जाते. प्रशालेत होणारे रक्षाबंधन, सरस्वती पूजन, हळदी-कुंकू, क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक सहल, वार्षिक स्नेहसंमेलन असे विविध कार्यक्रमांमध्ये या शालेय स्वराज्य सभेचा मोठा सहभाग असतो. त्याचप्रमाणे वेळोवेळी मंत्रिमंडळाच्या सभा घेऊन विद्यार्थ्यांच्या शाळेतील अडी-अडचणी समजावून घेऊन प्रशाला, संस्था, शिक्षक-पालक संघ यांच्याकडून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो.
प्रशालेमध्ये पार पडलेल्या या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री म्हणून कु. संस्कार रणजीत पाडावे इ. १२ वी हा १३० मतांनी विजयी झाला. प्राथमिक गटातून कु. रिद्धी प्रमोद सावंत – इ. ७ वी, कु. निहाल संजय मयेकर – इ. ७ वी, कु. पुष्कर सुनील चव्हाण – इ. ७ वी, माध्यमिक गटातून कु. कोमल पांडुरंग सावंत – इ. ८ वी, कु. तन्वी मनोज मेस्त्री – इ. १०वी, कु. मंदार मोती वरक – इ. १० वी तर उच्च माध्यमिक गटातून कु. शितल महेश चव्हाण – इ. १२ वी, ऋषिकेश चकोर घाडीगावकर – इ. १२ वी हे विद्यार्थी विजयी झालेत.
या निवडणूक प्रक्रियेमध्ये शिक्षकांमधून केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकारी म्हणून काम पाहिले गेले आणि मतमोजणी करण्यात आली. यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून प्रशालेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख ए. पी. पवार यांनी काम पाहिले. स्कूल कमिटी चेअरमन – के. आर. दळवी, मुख्याध्यापक – व्ही. व्ही. वगरे यांच्या उपस्थितीमध्ये अगदी शिस्तबद्धरित्या ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सर्व विजेत्यांचे संस्था, स्कूल कमिटी, शिक्षक-पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद, पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.











