कुडाळ (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनात जास्तीत जास्त वाचनावर भर द्यावा, चांगले संस्कारक्षम नागरिक बनून आपण आपल्या देशाचे व आपल्या आईवडिलांचे नाव उज्वल करा असे आवाहन प.पू. राऊळ महाराज ट्रस्ट पिंगुळीचे सह सचिव व प्रशालेचे माजी विद्यार्थी व प्रथितयश उद्योजक महेश धुरी यांनी केले. प.पू. राऊळ महाराज ट्रस्ट पिंगुळी मार्फत ट्रस्टचे अध्यक्ष व संस्थेचे विद्यमान संचालक दशरथ राऊळ यांच्या पुढाकाराने दरवर्षी प्रमाणे वह्या वाटप कार्यक्रम शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव मध्ये संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर प.पू. राऊळ महाराज ट्रस्टचे सह सचिव महेश धुरी, ट्रस्टचे राजन पांचाळ, प्रसाद दळवी, प्रभू , माजी विद्यार्थी सुखानंद हळदणकर, संस्था सचिव मुकुंद धुरी, प.पू.अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय साळगावच्या प्र. प्राचार्य ठाकूर, शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगावचे मुख्याध्यापक सलीम तकीलदार महाविद्यालयाच्या प्रा.सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ट्रस्ट मार्फत मोफत वह्या वाटप करण्यात आले. यावेळी राजन पांचाळ यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना सामाजिक बांधीलकीतून ट्रस्ट मार्फत राबविलेल्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. संस्था सचिव मुकुंद धुरी यांनी राऊळ महाराज ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करतानाच शाळेसाठी केलेल्या सहकार्यबद्दल संस्थेचा वतीने धन्यवाद दिले. वह्या वाटपाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक शिक्षक विश्वास धुरी व आनंद हळदणकर यांनी विशेष मेहनत घेतली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सलीम तकीलदार यांनी तर आभार सहा. शिक्षक विद्यानंद पिळणकर यांनी मानले.