तळकोकणातील जेष्ठ सी ए भाऊ वैद्य यांची वैश्य समाज पतसंस्थेच्या प्रधान कार्यलयास सदिच्छा भेट
फोंडाघाट (प्रतिनिधी) : ठेवी, कर्जपुरवठा, कर्जवसुली यांची सांगड घालून ग्राहकांचे हित प्रथम या तत्वानुसार कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेचे भविष्य उज्वल आहे. ठेवी, कर्ज वितरण आणि कर्जवसुली चा रेशीओ अत्यंत योग्य असून येत्या 10 वर्षांत पतसंस्थेची आलिशान भव्यदिव्य स्वमालकीची इमारत असेल असे गौरवोद्गार तळकोकणातील जेष्ठ चार्टर्ड अकाउंटंट श्रीकांत उर्फ भाऊ पांडुरंग वैद्य यांनी काढले. रत्नागिरी येथील जेष्ठ चार्टर्ड अकाउंटंट भाऊ वैद्य यांनी सोमवार 2 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेच्या फोंडाघाट येथील प्रधान कार्यलयास सदिच्छा भेट दिली.त्यावेळी ते बोलत होते. श्री. वैद्य यांचे वैश्य समाज सहकारी पतसंस्थेचे चेअरमन गणपत वळंजू यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देत पतसंस्थेच्या वतीने सत्कार केला.यावेळी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्योत्स्ना पिळणकर, वसुली अधिकारी मोहन मोदी, व्यवस्थापक रुचिता आडीवरेकर, अकाऊंट प्रज्ञा पावसकर आदी उपस्थित होते. या सदिच्छा भेटी दरम्यान जेष्ठ सी ए भाऊ वैद्य यांनी चेअरमन गणपत वळंजू, मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर तसेच सर्व सिनियर स्टाफ सोबत पतसंस्थेच्या वाटचालीबद्दल चर्चा करत मौलिक मार्गदर्शन केले.भाऊ वैद्य म्हणाले की, ग्राहक हा राजा आहे हे सर्व संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मनात बिंबवून प्रत्येक ग्राहकाला विनम्र आणि तत्पर सेवा देणे ही काळाची गरज आहे.बँकांपेक्षा पतसंस्थांची आर्थिक प्रगती जलदगतीने होते. बँकांना ज्या विविध मर्यादा असतात त्या पतसंस्थाना नसतात. सर्वात लहान कर्जदाराला सुद्धा कर्जपुरवठा करणे गरजेचे आहे. जो सावकारी कर्ज घेऊन व्याज परतफेडीच्या चक्रात अडकतो अशा लहान ग्राहकालाही वित्तपुरवठा करून वैश्य समाज पतसंस्थेने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करावी. पतसंस्थेचे टॅक्स ऑडिट 30 सप्टेंबर पूर्वी करून घेणे अत्यावश्यक आहे. यासह निष्णात सी ए असलेल्या भाऊ वैद्य यांनी काही मौलिक टिप्स ही चेअरमन वळंजू तसेच सीईओ पावसकर यांना दिल्या. चेअरमन गणपत वळंजू व सीईओ पावसकर यांनी मागील 33 वर्षातील पतसंस्थेची घोडदौड कथन केली. सध्या बँकांच्या धर्तीवर सर्व सुविधा ग्राहकांना दिल्या जात आहेत. पतसंस्थेचे व्याजदर हे सिम्पल रिड्युसिंग असून 5 वर्ष मुदतीत नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदाराला साडेआठ आणि 10 वर्षे मुदतीचे कर्ज विना थकीत नियमित परतफेड केल्यास केवळ नऊ टक्के व्याजदर पडतो. सुरुवातीला केवळ सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या वैश्य समाज पतसंस्थेला यावर्षी सहकार खात्याकडून संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र मंजुरी मिळाली असून लवकरच रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यात पतसंस्थेच्या शाखा सुरू करणार असल्याचे सांगितले.













