महिला आरोग्य अधिकाऱ्यावर अरेरावी आणि बांधकाम, महसूल अधिकाऱ्यांची पाठराखण; पालकमंत्र्यांची दुटप्पी भूमिका

भाजप नेते व पदाधिकारी यांच्या गुंडगिरीमुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कमकुवत

आमदार वैभव नाईक यांची टीका

कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले अनेक वर्षे सर्वसामान्य लोकांना डॉ. रुपेश धुरी हे वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांच्या पत्नी सई धुरी आपल्या जिल्ह्यामध्ये सेवा देण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून आत्मीयत्तेने काम करत आहेत. परंतु भाजप नेत्याचे खाजगी हॉस्पिटल चालविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी असणाऱ्या महिलेला जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे राणे समर्थकांच्या गराड्यात अर्वाच्य भाषेत धमकावत आहेत. तसेच भाजप कार्यकर्ते देखील त्या महिला आरोग्य अधिकाऱ्याला घालून पाडून बोलतात हे सर्व घडत असताना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी बघून मूग गिळून गप्प आहेत. भाजपच्या याच अरेरावी आणि गुंडगिरीमुळे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर येत नाहीत आणि कार्यरत आहेत त्या अधिकाऱ्यांना भाजपकडून अशी वागणूक दिली जाते. भाजप नेत्याचे खाजगी हॉस्पिटल चालावे यासाठीच हे प्रकार केले जात आहेत का? आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी मागील अडीच वर्षाच्या काळात कोणतीही उपाययोजना पालकमंत्र्यांनी केली नाही. अडीच वर्षाच्या काळात किती वैद्यकीय अधिकारी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणले हे त्यांनी एकदा जाहीर करावे. सार्वजिनक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने भ्रष्टाचार करूनही त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. महसूल विभागात, भूमिअभिलेख विभागात नागरिकांना आपली कामे करण्यासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात तरी देखील नागरिकांची कामे होत नाहीत. अशा अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी मोकाट सोडले आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम आणि महसूलच्या अधिकाऱ्यांकडून पालकमंत्री यांना १० कोटी रु. मिळतात का? ते सुद्धा त्यांनी जाहीर करावे. आरोग्य अधिकारी म्हणून काम करणाऱ्या महिलेला अर्वाच्य भाषा वापरून तिला हिन वागणूक देऊन भाजप कार्यकर्ते जिल्ह्यात कोणता संदेश देऊ पाहत आहेत. भाजप नेते व पदाधिकारी यांची अशी वागणूक असेल तर जिल्ह्याबाहेरचे वैद्यकिय अधिकारी का म्हणून जिल्ह्यामध्ये येतील. खाजगी हॉस्पिटल चालण्यासाठी आरोग्य अधिकारी, डॉक्टर यांच्यावर दडपशाही व गुंडगिरीकरून जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कमकुवत ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!