नांदेड मधील राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवीत राष्ट्रीय स्पर्धेत स्थान केले पक्के
एकूण तीन राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी अक्सा हिची झाली आहे निवड
राज्यस्तरीय स्पर्धेत सर्वाधिक स्कोअरर साठी पटकावले सिल्व्हर मेडल
सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : सिंधुकन्या अक्सा मुदस्सरनझर शिरगावकर हिने महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे मार्फत नांदेड येथे 14 वर्षांखालील वयोगटात घेण्यात आलेल्या आंतरशालेय राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविला असून तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान गुजरात येथे संपन्न होणार आहे. नांदेड येथे जिल्हा क्रीडा संकुल मधील मैदानात 19 ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा पार पडली. 14 वर्षे वयोगटातील राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील 8 विभागातील एकूण 32 स्पर्धक सहभागी झाले होते. या सर्व स्पर्धकांमधून अक्सा हिने चौथा क्रमांक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले आहे. तसेच या स्पर्धेत शेवटच्या राउंड मधील सर्वाधिक स्कोअर मध्ये अक्सा हिने सिल्व्हर मेडल ची कमाई केली आहे. या स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाला एकूण दोन राउंड खेळायला दिले जातात आणि शेवटच्या राउंड नंतर सर्वाधिक स्कोअर खेळाडू निवडले जातात. यात अक्सा हिने सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे. अक्सा हिने यापूर्वी सीबीएसई आर्चरी चॅम्पियनशिपच्या साऊथ झोन मध्ये 7 राज्यांतील 1 हजार 200 स्पर्धकांमधून टॉप फाईव्ह मध्ये स्थान मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. तर आर्चरी असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या 13 वर्षांखालील वयोगटातही अक्सा हिने राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक कमावून राष्ट्रीय स्पर्धेला पात्र ठरली आहे. अक्सा ही कणकवली तालुक्यातील कलमठ येथील शासकीय ठेकेदार मुद्स्सरनझर तैय्यब शिरगावकर आणि न्यू खुशबू स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या संस्थापिका तन्वीर शिरगावकर यांची सुकन्या आहे. पोदार इंटरनॅशनल स्कुल कणकवली मध्ये शिकत असलेल्या अक्सा हिने सातारा येथील दृष्टी आर्चरी अकॅडमी चे संस्थापक प्रशिक्षक प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुयश प्राप्त केले आहे. एकूण तीन राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या अक्सा हिचे सिंधुदुर्गात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.