प्रशासकीय आस्थापनातील हलगर्जीपणा दूर करून, जबाबदारीने काम केल्यास जनता- व्यापारी नक्कीच सहकार्य करील – ग्रामस्थ, व्यापारी
फोंडाघाट (प्रतिनिधी) : एकीकडे अभिनव ” रेझिंग सप्ताह ” आयोजित केला जात असताना, कणकवली तालुका पोलीस विभागाकडून “ग्रामसंवाद” चे आयोजन फोंडाघाट ग्रामपंचायतच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आले.या कार्यक्रमासाठी सरपंच संजना आग्रे, पोलीस निरीक्षक कणकवलीचे मारुती जगताप, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार आघाव, पोलीस कॉन्स्टेबल वंजारे ,वनविभागाचे कोळेकर, तलाठी सावंत, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पो. नि. जगताप यांनी ग्रामसंवाद उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. पोलिसाबद्दलची भीती जनसामान्यात कमी होऊन, नागरिकांशी स्नेह आणि थेट संवाद साधून संभाव्य गुन्हे आणि अडचणी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांसह चर्चेने मार्ग निघावा. शांतता व सुव्यवस्था शेवटच्या ग्राम पातळी पर्यंत राहावी. या हा यामागचा उद्देश आहे.
यावेळी उपस्थित ग्रामस्थ – व्यावसायिक -प्रतिष्ठित व्यक्ती- रिक्षा चालक- वाहन चालक इत्यादींनी गावच्या समस्यांचा पाढाच वाचला. हा ग्राम संवाद वरचेवर व्हावा अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.गावच्या रस्ता रुंदीकरणाचा भ्रष्टाचार व रेंगाळलेला प्रश्न,अन्य भ्रष्टाचाराची कामे,कित्येक वर्ष बंद पडलेले सीसीटीव्ही आणि त्यांचे थकीत बिल -भाडे,ओव्हरलोड वाहतूक, विना क्लीनर वाहनांची वर्दळ, वाहन कोंडी,त्यामुळे होणारा त्रास याकडे सर्व स्तरातून होणारे दुर्लक्ष, पेठेमध्ये सुव्यवस्थेसाठी आरटीओ विभागाकडून तंगळ मंगळ या बाबी चर्चेत आल्या. यावेळी जगताप यांनी समाजाने ही दक्ष राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले. संतप्त ग्रामस्थांनी प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देत नाही. दोन आस्थापनातील संभ्रम -गैरसमज यांच्याशी जनतेचे काही देणे नाही.मात्र त्यात हलगर्जीपणा होतो. त्यामुळे जबाबदारी न झटकता, पोलीस- वीज- रस्ते- ग्रामपंचायत यांनी आपले अधिकार वापरून सजग राहिल्यास, जनता व व्यापारी तुम्हाला नक्की सहकार्य करेल अशी ग्वाही ग्रामस्थ- व्यापाऱ्यांनी दिली. शेवटी सरपंच आग्रे यांनी, गावातील चोरी- दरोड्याचा जलद गतीने तपास केल्याबद्दल पोलिसांना धन्यवाद दिले व येथील जनता नक्की ग्राम संवादाला प्रतिसाद देईल अशी ग्वाही दिली.













