ठार मारण्याचा उद्देशाने केले अपहरण ; कोल्हापूर एलसीबी पथकाने केली सुखरूप सुटका

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मोहन दिनकर आडसुळ वय 55 वर्षे रा. निगवे दुमाला, ता. करवीर याचा मुलगा विशाल मोहन आडसुळ वय 26 रा. भुये, ता. करवीर, जि. कोल्हापूर यास दि.०९ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्रौ ९: १५ च्या सुमारास भुयेवाडी कमानीजवळून, ता. करवीर येथून अज्ञात इसमांनी अज्ञात कारणाकरीता अपहरण करुन चारचाकी गाडी मधून नेले आहे. अशा मजकुरची करवीर पोलीस ठाणे येथे दिले तक्रारीवरून करवीर पोलीस ठाणे येथे गु. रं. नं. 67/2025 भा. न्या.स. क. 140 (3) प्रमाणे दि. ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल केला आहे.

सदरचा अपहरणाचा गुन्हा दाखल झालेनंतर गुन्ह्याचे घटनास्थळी सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत साो यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन अपहरण झालेली व्यक्ती ही सुस्थितीत मिळणेकरीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व करवीर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांना त्यांचेकडील तपास पथके तयार करून सर्वतोपरी प्रयत्न करुन लवकरात लवकर अपहरण झालेल्या व्यक्तीचा शोध घेणेसह गुन्हा उघडकीस आणणेच्या दृष्टीने सुचना देवून योग्य ते मार्गदर्शन केले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्था. गु. शाखेकडील ०३ तपास पथके तयार करून विशाल मोहन आडसुळ याचे अपहरण केलेले ठिकाणापासून कोल्हापूर, सांगली जिल्हा परिसरात स्थानिक लोकांना सोबत घेवून झाडीझुडपे, ऊसशेती, डोंगर, निर्जन ठिकाणी अशी सर्व ठिकाणे पिंजून काढून अपहरण झाले व्यक्तीचा अविरतपणे शोध घेणेचे काम चालू केले. सदरचा गुन्हा दाखल झालेपासून अपहरण झालेले व्यक्तीचा अविरतपणे शोध घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तपास पथकातील पो. हे. कॉ. १३९९ रामचंद्र कोळी यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गुन्ह्यातील अपहरीत व्यक्ती विशाल मोहन आडसुळ याचे अपहरण श्रीकृष्ण महादेव कोकरे रा. कुपवाड, मिरज, सांगली याने त्याचे साथीदारासह मिळून केले आहे. तसेच श्रीकृष्ण महादेव कोकरे हा सांगली येथे आहे, अशी बातमी मिळाल्याने लागलीच पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांचे पथक सांगली येथे रवाना होवून अंकली पुल, जि. सांगली येथे श्रीकृष्ण महादेव कोकरे व.व.४५, रा. वाघमोडेनगर, कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली यांस सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अपहरीत व्यक्तीबाबत तपास केला असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेवून कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली. तसेच सदरचा गुन्हा हा त्याने त्याचे आणखीन ६ साथीदारासह केला आहे अशी माहीती दिली. तसेच अपहरीत व्यक्ती विशाल मोहन आडसुळ याचे भुये, ता. करवीर येथून अपहरण करून त्यास वेधस अपार्टमेंट, मिरज कोर्टच्या मागे, मिरज, जि. सांगली येथे कोंडून ठेवले असल्याचे सांगितले. त्यानंतर श्रीकृष्ण कोकरे याचेसह वेधस अपार्टमेंट, मिरज येथे जावून पाहीले असता तेथील फ्लॅटला कुलूप असल्याचे दिसुन आलेने सदरचे कुलूप व दरवाजा तोडुन आत प्लॅटमध्ये पाहणी केली असता अपहरीत व्यक्ती विशाल आडसुळ यास दोरीने बांधलेले व जबर मारहाण केली असल्याने तो जखमी असल्याचे दिसुन आले. त्याची सुटका करून त्यास औषधोपचारासाठी एका पथकासोबत कोल्हापूर येथे रवाना केले. तसेच मिरज येथे इतर आरोपींचा शोध घेतला असता आरोपी नामे धीरज उर्फ हणमंत नामदेव पाटील व.व.५६, रा. कवटे पिरान, ता. मिरज, जि. सांगली व राजेंद्र परमेश्वर क‌ट्टीमनी व.व.३३, रा. कुपवाड एमआयडीसी, ज्ञानगिरी वसाहत, सावळी, ता. मिरज, जि. सांगली हे मिळुन आलेने त्यांना ताब्यात घेतले. तसेच त्याचेकडे विचारणा केली असता श्रीकृष्ण कोकरे याची मुलगी श्रुती हिची विशाल आडसुळ याचेशी इंस्टाग्रामवर ओळख होवून ७ महिन्यापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केला.

होता. त्यांना तो प्रेमविवाह मान्य नसल्याने त्यांनी त्यास मारणेचे उद्देशाने अपहरण केले असल्याचे सांगितले. तसेच त्यांचे कब्जातुन गुन्ह्यात वापरलेली कार व एक मोटारसायकल असा एकुण ४,३0,000/- रूपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशाल मोहन आडसुळ यांस औषधोपचाराकरीता कानडे हॉस्पिटल, व्हिनस कॉर्नर, कोल्हापूर येथे अॅडमिट केले आहे. तसेच आरोपी नामे 1) श्रीकृष्ण महादेव कोकरे व.व.४५, रा. वाघमोडेनगर, कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली २) धीरज उर्फ हणमंत नामदेव पाटील व.व.५६, रा. कवटे पिरान, ता. मिरज, जि. सांगली, 3) राजेंद्र परमेश्वर कट्टीमनी व.व.३३, रा. कुपवाड एमआयडीसी, ज्ञानगिरी वसाहत, सावळी, ता. मिरज, जि. सांगली यांना पुढील कायदेशीर कारवाई करीता करवीर पोलीस ठाणे येथे रिपोर्टाव्दारे हजर केलेले आहेत, उर्वरीत ०४ आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित सो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार अमोल कोळेकर, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, संदीप बेंद्रे, लखन पाटील, अमित सर्जे, रूपेश माने, महेंद्र कोरवी, सागर माने, हंबीर अतिग्रे, राजू येडगे, युवराज पाटील, अमित मर्दाने यांनी केली आहे

error: Content is protected !!