जि. प. शाळा चिंदर नं १ येथे नवागतांचे स्वागत….!
आय पी एस् सुभ्रमण्य केळकर यांची प्रमुख उपस्थिती
आचरा (प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्यात आज १६ जून रोजी एकाच दिवशी सर्व शाळा सुरू झाल्या असून मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चिंदर नं १ शाळेत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांकरिता नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सोक कार्यक्रम आय, पी, एस्. सुभ्रमण्य केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. शाळेतील इयत्ता १ पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचे आय. पी. एस्. सुभ्रमण्यम केळकर यांच्या हस्ते शालेय पुस्तके, गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना केळकर म्हणाले की, प्राथमिक शिक्षण हि आपल्या पुढील आयुष्याची पहिली पायरी आहे. आता पासून जिवनाच्या वेगवेगळ्या अनुभवांना सुरूवात होते.दिवसेंदिवस स्पर्धात्मक युगात जर आपल्याला टिकायच असेल तर चांगल शिक्षण घ्या अभ्यास करा, त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षणाला शासनाने ही अतिशय महत्त्व दिले आहे. सांस्कृतिक, खेळ, आरोग्य, योग, शारीरिक शिक्षण यांनाही शासन महत्त्व देत आहे. यासाठी प्राथमिक शिक्षणचा आनंद घेत मजा करत शिक्षण घ्या. आनंदमयी शिक्षण घ्या. तसेच शिक्षकांनी वेगवेगळ्या उपाययोजना करत, विविधांगी उपक्रम राबवत, पटसंख्या दाखवण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला यावेळी केळकर यांनी दिला.
यावेळी केंद्र प्रमुख राजेंद्र प्रसाद गाड, सचिन तवटे, मकरंद केळकर, ॲड. गायत्री राजोपाध्याय-केळकर, दिनेश पाताडे, निलिमा घाडी, रावजी तावडे, शाळा कमिटी अध्यक्ष रणजित, पालक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.











