खारेपाटण येथे अंमली पदार्थविरोधी महाविद्यालयाच्या वतीने जनजागृती रॅली व व्याख्यानाचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी दिन (International Anti-Drug Day – 26th June) दिनानिमित्त कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) तसेच आजीवन अध्ययन व विस्तार विभाग (DLLE) आणि विद्यार्थी विकास कक्ष (Stud ent Development Cell) यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२८ जून २०२५ रोजी विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये घोषणाबाजीसह भव्य रॅली आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान यांचा समावेश करण्यात आला होता.

“अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, कारणे आणि प्रतिबंध” (Drug Abuse: Causes, Consequences, and Prevention) या विषयावर प्रा. पी. जी. शिंदे यांनी विद्यार्थ्यांसमोर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी अंमली पदार्थांच्या आहारी जाण्यामागील मानसिक, सामाजिक व कौटुंबिक कारणांचा वेध घेतला. या समस्येचे आरोग्यावर होणारे परिणाम, शैक्षणिक आणि सामाजिक जीवनातील बिघाड,तसेच कायदेशीर दृष्टीने होणारे परिणाम त्यांनी स्पष्ट केले. विविध उपाययोजनांची माहिती देत, “संवेदनशीलतेतून प्रतिबंध आणि शिक्षणातून परिवर्तन” या सूत्रावर त्यांनी भर दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.आत्माराम कांबळे यांनी मनोगतात म्हटले की, “विद्यार्थ्यांनी नशाविरोधी विचार रुजवून महाविद्यालयीन वातावरण सकारात्मक ठेवावे. समाजात जबाबदार नागरिक म्हणून उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे.” प्रमुख पाहुणे म्हणून वसीम सय्यद (NSS जिल्हा समन्वयक, सिंधुदुर्ग) यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “नशा ही केवळ एक वैयक्तिक समस्या नसून ती सामाजिक रचनेला गालबोट लावणारी गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांनी ‘सेवा हेच साधन’ या विचारातून नशामुक्त समाजाच्या निर्मितीत सहभागी व्हावे.असे त्यांनी यावेळी सर्वांना आवाहन केले.

तसेच या उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून बाजारपेठ मार्गे महाविद्यालयाच्या खेळाच्या मैदानापर्यंत अंमली पदार्थविरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली. स्वयंसेवकांनी “Say No To Drugs”, “Nasha Mukt Bharat”, “Drug Free Youth – Strong Nation” अशा घोषणांचा आवाज आसमंतात घुमवत सामाजिक बांधिलकी प्रकट केली. महाविद्यालयाच्या खेळाच्या मैदानावर रॅलीचा समारोप झाला. कार्यक्रमात NSS, DLLE व विद्यार्थी विकास कक्षामार्फत राबविलेल्या या उपक्रमामध्ये महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उपस्थित मान्यवरांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये नशाविरोधी भावनांची ठसठशीत पेरणी झाली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश खांडेकर यांनी केले. प्रास्ताविक सुयश मोरे यांनी केले तर आभारप्रदर्शन सिद्धी हर्यान यांनी केले.

error: Content is protected !!