तुळशी विवाहात पावसाचे विघ्न ; भात-नाचणी पिकांचे मोठे नुकसान

वैभववाडी (प्रतिनिधी) : सोमवारी तुळशी विवाहाच्या शुभमुहूर्तावर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तुळशी विवाहाचा आनंद ओसरला. सकाळपर्यंत वातावरण आल्हाददायक असले तरी दुपारनंतर अचानक आलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांना अक्षरशः घरात खिळवून ठेवले. दुपारपासून सुरू झालेल्या पावसाच्या सरींनी वैभववाडी तालुक्यासह परिसरातील गावांना झोडपून काढले. विवाह, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना पावसामुळे अडथळा निर्माण झाला. तुळशी विवाहासाठी गावोगावी घरासमोर सजावट आणि पूजा-कार्यक्रमांची तयारी करण्यात आली होती, मात्र अचानक आलेल्या मुसळधार पावसाने सर्वांच्या आनंदावर विरजण पडले. रविवारी काहीशी उसंत घेतल्यामुळे पाऊस जाईल असे वाटतं होते. मात्र सोमवारी दुपारनंतर जोरदार पावसाने तालुक्यात मोठी हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे भात शेती बरोबरच नाचणी पिकांचेही मोठे नुकसान होत आहे.भात खाचरात पाणी साचल्याने भात, नाचणी पिकाला कोंब येऊ लागले आहेत उगवण्याचा धोका निर्माण झाला आहे, तर नाचणीच्या पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. तालुक्यातील विविध भागांतून शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती मिळत आहे. अनेक ठिकाणी शेतीतून पिकांची काढणी सुरू असतानाच पावसाने अचानक जोर धरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

error: Content is protected !!