यावर्षी चुरमुरे मऊ झाले, फटाके पेटेनासे – पावसांच्या अक्षतांमध्ये तुळसाक्का, गुरुजी आणि वऱ्हाडी चिंब – मात्र उत्साहाला उधाण!

फोंडाघाट पंचक्रोशीत धुवाधार पर्जन्यवृष्टीत तुलसी विवाह संपन्न !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : दुपारपासूनच फोंडाघाट पंचक्रोशीत धुवांधार पर्जन्यवृष्टीला सुरुवात झाली. अन् तुळशी विवाहाच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र असल्या संकटांना आणि अडचणींना घाबरेल तो कोकणी नव्हेच? गोरज मुहूर्तावर पारंपारिक, नित्यनियमाप्रमाणे गुरुजी विवेक जोशी हवेलीनगरातील साईमंदिरात उपस्थित झाले आणि रात्रि उशिरापर्यंत पंचक्रोशीत तुलसी विवाह सोहळा उदंड उत्साहात मंगलाष्टकांच्या चढाओढीत संपन्न झाला.

सकाळच्या सत्रात ऊन पडल्यामुळे आणि आठवडी बाजाराच्या निमित्ताने विवाह सामग्री खरेदीसाठी आजूबाजूच्या परिसरातून पेठेमध्ये गर्दी झाली होती. नाडापुडी, आवळे-चिंचा, उसाची वाडे, चुरमुरे, बुंदी लाडू, शेंगदाणा लाडू, दही-दूध आणि फटाक्यांच्या दुकानात एकच झुंबड होती. संततदार कोसळणाऱ्या पावसामुळे चुरमुरे मऊ झाले होते आणि फटाके पेटेनासे? यामुळे दुकानात ग्राहक सजग! मात्र ग्राहकांनी शास्त्राप्रमाणे सर्व काही खरेदी केले.

संध्याकाळी लग्नाला तांदळाच्या-फुलांच्या अक्षता ऐवजी पावसाच्या अक्षतांनी जोर धरला. फराळ, चुरमुरे, ओले पोहे अशा साजशृंगारात आणि पावसाच्या संततधारेत, छत्रीच्या आडोशात विवेक जोशी यांच्या खड्या मंत्रोच्चाराच्या अन मंगलाष्टकाच्या चढाओढीत उदंड उत्साहात घरोघरीचे तुलसी विवाह संपन्न झाले. यामध्ये युवाईचा उत्साह आपल्या परंपरा, आणि संस्कार, संस्कृती जपणारा लक्षवेधी होता. मधूनच एखाद्या फटाक्याच्या माळेचा तर ॲटमबॉम्ब चा आवाज आसमंत थरारून, संततधारेला आव्हान देत होता. जल्लोषात रात्री उशिरापर्यंत तसेच काही ठिकाणी पहाटेपर्यंत तुलसी विवाह उदंड उत्साहात सुरू होते.

error: Content is protected !!