अखेर न्याय मिळालाच ; राजकीय आकसाने दाखल गुन्ह्यात सत्य आले समोर
कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान १८ डिसेंबर २०२१ रोजी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा कार्यकर्ता संतोष मनोहर परब (रा. कनकनगर, कणकवली; मूळ गाव करंजे गावठाणवाडी) याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या गुन्ह्यात तत्कालीन आमदार व विद्यमान पालकमंत्री नितेश राणे, जि.प.चे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि मंत्री नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश प्रल्हाद परब यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने दोषमुक्त केले असल्याचे अॅड. संग्राम देसाई यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
कुडाळ येथील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ऍड.संग्राम देसाई बोलत होते. यावेळी अॅड. अविनाश परब, जान्हवी दुधवाडकर, संजना देसाई व सौरभ देसाई उपस्थित होते.
संतोष परब हल्ला प्रकरणात कणकवली पोलिस ठाण्यात कलम ३०७, २०१, १२०(ब) आणि ३४ अंतर्गत तत्कालीन आमदार नितेश राणेंसह अन्य ११ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपासानंतर पोलिसांनी एकूण ११ आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते. त्यात नितेश राणे हे आरोपी क्रमांक एक, संदेश सावंत हे आरोपी क्रमांक दोन आणि राकेश परब आरोपी क्रमांक चार होते. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये जाब, साक्षी, घटनास्थळ पंचनामा आणि अन्य पुरावे न्यायालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, या पुराव्यांवरून या तिघांवर थेट दोष निश्चित होत नसल्याने आम्ही दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता. आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो. तपासादरम्यान पोलिसांनी गोळा केलेले सर्व पुरावे आणि कागदपत्रांचा सखोल अभ्यास केल्यानंतर न्यायालयाने याची दखल घेतली. सर्वोच्च न्यायालयाने ज्या अटींनुसार दोष निश्चित करणे अपेक्षित आहे, त्या निकषांनुसार जर पुरावा आरोपीविरुद्ध नसेल, तर दोषमुक्तता देणे न्यायालयाचे कर्तव्य आहे.कणकवली पोलिसांनी सादर केलेले दोषारोप पत्र संपूर्णपणे तपासून पाहिल्यानंतर, जिल्हा न्यायाधीश क्र. १ व्ही.एस. देशमुख यांनी या तिन्ही आरोपींच्या विरुद्ध कोणताही ठोस पुरावा नाही, असे नमूद करत दोषमुक्तीचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने दिलेला हा निकाल न्यायप्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे.असे ऍड.संग्राम देसाई यांनी सांगत या प्रकरणातील इतर आरोपींची सुनावणी अद्याप सुरू असून त्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया पुढे चालणार असल्याचेही स्पष्ट केले.
दि.१८ डिसेंबर २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली येथे झालेल्या एका राजकीय वादातून कार्यकर्ता संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर जिल्हाभरात राजकीय वातावरण तापले होते. या घटनेवरून तत्कालीन आमदार तथा विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह काही कार्यकर्त्यांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने नितेश राणे यांच्यासह अन्य दोन आरोपींना दोषमुक्त केल्यामुळे पालकमंत्री तथा भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.












