नाधवडे चारवाडी ‘सखी’ मतदान केंद्र ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू.

वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी वैभववाडी तालुक्यात मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. शासनाच्या ‘सखी मतदान केंद्र’ या संकल्पनेनुसार तालुक्यातील नाधवडे चारवाडी येथील मतदान केंद्राची निवड करण्यात आली होती. महिलांसाठी विशेष सुविधा आणि अनोखी सजावट यामुळे हे मतदान केंद्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

या सखी मतदान केंद्राची आकर्षक आणि कल्पक पद्धतीने सजावट करण्यात आली होती. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उभारण्यात आलेला सेल्फी पॉइंट हा केंद्राचे खास आकर्षण ठरला. तसेच स्तनदा मातांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष तयार करण्यात आल्याने महिला मतदारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. मतदानासाठी येणाऱ्या मतदारांच्या बसण्याच्या सोयीसाठी केंद्राबाहेर सुशोभित सभामंडप उभारण्यात आला होता.विशेष बाब म्हणजे या मतदान केंद्रावर कार्यरत असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी महिला होत्या. केंद्राध्यक्ष म्हणून वैशाली काकडे यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्यासोबत मतदार अधिकारी मनस्वी कांबळे, जयश्री शेटे, सिद्धी बाईक, पोलीस कॉन्स्टेबल हर्षदा थोरात, व्यवस्थापक शुभांगी सुतार तसेच दीपा अटकेकर या महिला कर्मचारी कर्तव्य बजावत होत्या.

या सखी मतदान केंद्राला निवडणूक निरीक्षक शंकर बर्गे तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी भेट देऊन पाहणी केली. महिलांच्या सक्षमीकरणाचा सकारात्मक संदेश देणारे हे मतदान केंद्र मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरले.

error: Content is protected !!