वंचित नागरिकांना रास्त धान्य दुकानात रेशन मिळणार
खारेपाटण (प्रतिनिधी ) : खारेपाटण गट विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या रास्त धान्य दुकानातील काही रेशन कार्ड धारकांना गेले दोन महिने ऑनलाईन अपडेट मुळे धान्य मिळत नव्हते.अखेर खारेपाटण गावचे माजी सरपंच श्री रमाकांत राऊत व विद्यमान सरपंच सौ प्राची इसवलकर यांनी कणकवली तहसीलदार आर जे पवार यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली.त्यामुळे सुमारे १५० पेक्षा अधिक कार्ड धारक वंचित नागरिकांना आता खारेपाटण रास्त धान्य दुकानावर रेशन धान्य मिळणार असून खारेपाटण दशक्रोशितील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कणकवली तहसीलदार कार्यालय धान्य पुरवठा अधिकारी श्री रमेश कांबळे यांनी खारेपाटण येथील रेशन कार्ड धारक नागरिकांची मागणी विचारत घेऊन तातडीने ऑनलाइन अपडेट कामाची कार्यवाही करून गेली २ महिन्या पासून रेशन धान्यपासून वंचित असलेल्या नागरिकांना रेशन धान्य मिळण्यासाठी प्रयत्न केले. ज्या रेशनकार्ड धारकांना पूर्वी धान्य मिळत होते. परंतु गेल्या दोन महिन्यात धान्य मिळणे अचानक बंद झाले.अशा सर्व रेशन कार्ड धारकांना आता पूना धान्य मिळणार असल्याने नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान आमदार नितेश राणे यांनी देखील नुकतीच कणकवली तहसील कार्यालयात अचानक भेट देऊन नागरिकांची अपूर्ण कामे न ठेवता ती तातडीने पूर्ण करा.अशा सक्त सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. खारेपाटण गावचे माजी सरपंच श्री रमाकांत राऊत यांनी जनतेच्या प्रश्ना संदर्भात कणकवली तहसील कार्यालयाला आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
” तसेच लवकरच खारेपाटण येथे रेशनकार्ड धरकांचा विशेष कॅम्प लावण्यात येणार असून जे व्यक्ती मयत असतील अशी नावे रद्द करून ज्यांना धान्य मिळत नाही अशी नावे नव्याने समाविष्ट करून जास्तीत जास्त नागरिकांना रेशन वरील धान्य कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणार करून याबाबत प्रांताधिकारी श्री जगदीश कातकर यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली असल्याचे असल्याचे खारेपाटण विद्यमान सरपंच सौ प्राची इसवलकर यांनी सांगितले.”











