सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : अजित पवार यांनी शिवसेना भाजपा सोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हाही राजकीय घडामोडींच्या उंबरठ्यावर असून लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ” संदेश ” देणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे.अजित पवारांच्या बंडानंतर राज्यात बदललेल्या राजकीय समिकरणांचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यातही तत्काळ दिसून आला आहे.विद्यमान जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आम्ही शरद पवार साहेबांसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले तर दुसरीकडे कणकवलीत राष्ट्रवादी काँग्रेस चे स्थानिक नेते तथा माजी नगरसेवक अबिद नाईक यांनी अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल जल्लोष केला तर तिसरीकडे माजी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांनी आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले. विद्यमान जिल्हाध्यक्ष अमित सामंत हे शरद पवार यांच्यासह नूतन विरोधी पक्षनेता तथा प्रतोद जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. अबिद नाईक हे अजित पवारांसोबतच हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय, तर प्रफुल्ल सुद्रीक हेही अजित पवार यांचे निकटवर्तीय. त्याचप्रमाणे सध्या अन्य पक्षात असलेला जिल्ह्याचा मोठा नेता हा छगन भुजबळ यांच्या अगदी खास मर्जीतील आहे. अगदी ईडी च्या कारवाईत भुजबळ जेलमध्ये असताना ह्या जिल्हास्तरीय नेत्याने स्वतः दुसऱ्या पक्षात असला तरीही आपल्या वैयक्तिक दृढ संबंधांपोटी आपुलकीने भुजबळ यांची ख्यालीखुशाली विचारण्यासाठी अनेकदा भेट घेतलेली होती. आता तर छगन भुजबळ हे स्वतः मंत्री आहेत. काल रविवारी राज्यात राजकीय समीकरणे बदलुन अजित पवारांसह छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सिंधुदुर्गातील अन्य पक्षात असलेल्या त्या नेत्याने लागलीच मुंबई गाठली आहे. सध्या असलेल्या पक्षात दिलेली जबाबदारी ही केवळ नावापुरती असून ठोस काहीच सांगितले जात नाही अथवा शब्द दिला जात नसल्याने ह्या नेत्याला नेतृत्वगुण असूनही म्हणावी तशी काही हालचाल करता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत दोन दिवसांनी येत्या 5 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची मिटिंग बांद्रा मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे असे सांगितले आहे.सुनील तटकरे यांच्याकडे पक्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी देत असतानाच त्यांना संघटनात्मक बदल करण्याचे सर्वाधिकार दिलेले आहेत. त्यामुळे कदाचित याच मीटिंगमध्ये लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस कडून सिंधुदुर्ग च्या राजकारणात नवा ” संदेश ” देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सिंधुदुर्गात राष्ट्रवादी काँग्रेस देणार ” संदेश ” ?











