“कोकणातील गुरव समाजाला संघटित करून आर्थिक दृष्ट्या सक्षम करणारं…” – शशिकांत शिरसागर
खारेपाटण (प्रतिनिधी) : राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार विजयराजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व संकलपनेतून कोकणातील विशेष करून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेड्यापाड्यात शासनाच्या विविध योजना पासून आजही उपेक्षित असलेल्या गुरव समाजाला राष्ट्रीय अभियानाच्या माध्यमातून संघटित करून त्यांना आर्थिक दृष्टया सक्षम करणार.” असल्याचे भावपूर्ण उदगार अखिल भारतीय गुरव समाज महासंघाचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिरसागर यांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारगाव येथे सिताई फार्म हाऊस अँड रिसॉर्ट येथे गुरव समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभियानात बोलताना काढले.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय गुरव समाज राष्ट्रीय संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष नवलजी शेवाळे,प्रदेश उपाध्यक्ष बंडूशेठ खंडागळे,राष्ट्रीय गुरव समाज युवा अध्यक्ष मिलिंद काळे (अमरावती), गुरव समाजाचे दिल्ली येथील वरिष्ठ पत्रकार डॉ.राजेंद्र वाघमारे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुरव समाजाचे नेते व अभियानाचे आयोजक तानाजी गुरव व खारेपाटण विभगातील गुरव समाजाचे कार्यकर्ते मंगेश गुरव आदी प्रमुख मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने मेळाव्याला प्रुमख उपस्थित असलेले राष्ट्रीय गुरव समाजाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब शिरसागर यांचे आयोजक तानाजी गुरव यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तर उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी यांचे देखील सिंधुदुर्ग जिल्हा गुरव समाजाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी गुरव समाज ज्ञाती बांधवांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष शिरसागर पुढे म्हणाले. कोकणातील गुरव समाजाला संघटित करण्यासाठी राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने ‘संपर्क अभियान व समाज जोडो ‘ अभियान कोकणसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणार असून नुकतेच राज्य शासनाने गुरव समाजासाठी संत काशीबा आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले आहे.याचा फायदा परतफेड कर्ज योजना सबसिडीच्या माध्यमातून गुरव समाजाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.तसेच या महामंडळाच्या माध्यमातून देण्यात येणारा निधी ५० कोटी वरून १०० कोटी करण्याची मागणी शासनाकडे करण्यात येणार असून गुरव समाजातील जो पारंपरिक पुजारी गुरव म्हणून करणाऱ्या समाज बांधवाना २५०००/- रुपये दरमहा मानधन देण्यात यावे अशी देखील मागणी राष्ट्रीय गुरव समाज महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने शासनाकडे करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री बाळासाहेब शीरसागर यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुरव समाज ज्ञाती बांधव तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी गुरव यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मंगेश गुरव यांनी मानले.














