सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सम्यक साहित्य संसद ही वाङमयीन चळवळीतील अग्रेसर संस्था असून या संस्थेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या सभेत कार्यकारिणीत बदल करण्यात आला असून संस्थेच्या अध्यक्षपदी प्रसंवाद या वार्षिकांकाचे संपादक इंजि.अनिल जाधव यांची तर कार्यवाहपदी प्रसिद्ध निवेदक, कवी राजेश कदम यांची निवड करण्यात आली.
सम्यक साहित्य संसद या संस्थेची स्थापना कोकणातील पुरोगामी कवितेचे जनक, ज्येष्ठ कवी आ. सो. शेवरे यांनी केली असून या संस्थेच्या माध्यमातून विविध वाङमयीन उपक्रम राबविले जातात. यामध्ये कवीसंमेलनं, चर्चासत्रं, साहित्य संमेलनं, साहित्यिक मेळावे, पुस्तक प्रकाशनं इ. कार्यक्रमाचा समावेश आहे. संस्थेचे मुखपत्र असलेल्या प्रसंवाद या वार्षिकांकातून नव्या लिहित्या हातांना प्रोत्साहन दिले जाते. आ. सो. शेवरे यांच्या निधनानंतरही, कवी, कथालेखक सुनील हेतकर (अध्यक्ष) व कवी सिद्धार्थ तांबे (कार्यवाह) यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमांत खंड पडला नाही. कणकवली येथे संपन्न झालेल्या संस्थेच्या विशेष बैठकीत, विद्यमान कार्यकारिणीचा काळ संपुष्टात आल्याने नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.
या बैठकीत जाहीर करण्यात आलेली संस्थेची कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे.
अध्यक्ष: इंजि. अनिल जाधव (वेंगुर्ला ), कार्यवाह : राजेश कदम, (कुडाळ) उपाध्यक्ष: प्रा. सिद्धार्थ तांबे (कणकवली), सहकार्यवाह: मधुकर मातोंडकर (वेंगुर्ला), कोषाध्यक्ष:कवयित्री संध्या तांबे, (ओरोस), हिशेेब तपासणीस :दीपक तळवडेकर, (कणकवली ) हे पदाधिकारी असतील तर कार्यकारणी सदस्य म्हणून साहित्यिक सुनील हेतकर (वैभववाडी), कवी अरूण नाईक (वेंगुर्ला), कवी व बालसाहित्यिक विठ्ठल कदम (सावंतवाडी), अभय शेवरे (देवगड), शाहीर प्रतिक पवार (वैभववाडी), कवयित्री मनिषा जाधव (वेंगुर्ला), कवयित्री स्नेहा विठ्ठल कदम (सावंतवाडी), स्नेहल तांबे (कणकवली) व कवी बाळकृष्ण जाधव (कणकवली) यांचा समावेश असेल. या कार्यकारिणीचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे.
अध्यक्षपदाची सूत्र स्विकारताना इंजि. अनिल जाधव म्हणाले, यापूर्वीच्या कार्यकारिणीने संस्थेचे नाव कोकणातून, राज्य पातळीवर पोहोचविले. महाराष्ट्रातील मान्यवरांना जीवनगौरव व राज्यस्तरीय काव्य पुरस्कार देऊन सन्मानित केले. या उपक्रमांत, भविष्यातही खंड पडणार नाही. आमची नुतन कार्यकारिणीही आ.सो. शेवरे यांनी आयुष्यभर जपलेल्या व आम्हां कार्यकर्त्यांना आखून दिलेल्या सिद्धांतानुसार कार्य करेल व सम्यक साहित्य संसदेचे कार्य राज्य व देशपातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न राहील. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.











