नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका
कोल्हापूर (रोहन भिऊंगडे): कोल्हापूर,ऐन दिपावलीच्या काळात शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो आणि माता-भगिनी पाण्यासाठी वणवण फिरतात, ही बाब महापालिका प्रशासनास अशोभनिय आहे. त्यामुळे नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका. बालिंगा उपसा केंद्राचे काम त्वरित पूर्ण करून, शहराच्या पाणीपुरवठा सुरळीत करा अशा सूचना आमदार जयश्री जाधव यांनी दिल्या. आमदार जयश्री जाधव यांनी माजी महिला नगरसेविकांसह बालिंगा उपसा केंद्राला भेट देऊन, कामाची पाहणी केली व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी माजी महापौर स्वाती येवलुजे, माजी नगरसेविका दीपा मगदूम, भारतीताई पवार, माधुरी लाड, उमा बनसोडे, पूजा नाईकनवरे, शोभा कवाळे, मेहजबीन सुभेदार, विक्रम जरग, करण शिंदे, शेखर पवार, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपजल अभियंता युनूस भेटेकर, शाखा अभियंता राजेंद्र हुजरे, जयेश जाधव, अभिलाषा दळवी आदी उपस्थित होते. उपसा केंद्राच्या दुरुस्तीचे काम जोखमीचे आहे, तरीही युद्धपातळीवर काम करून, शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करा अशी सूचना आमदार जाधव यांनी दिली तसेच जोखमीचे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करणार असल्याचे आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले.









