ओसरगाव तलाव, हरकुळ तलाव तसेच कलमठ कलेश्वर मंदिर गार्डन परिसराचे होणार सुशोभीकरण
भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी आमदार नितेश राणेंकडे केलेला पाठपुरावा आला कामी
कणकवली़ (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी कणकवली तालुका पर्यटन विकासासाठी तब्बल 5 कोटींचा निधी प्रादेशिक पर्यटन मधून मंजूर करून आणला आहे. या निधीतून राष्ट्रीय महामार्गालगतचे ओसरगाव तलाव, हरकुळ तलाव परिसर सुशोभीकरण तसेच कलमठ कलेश्वर मंदिर गार्डन परिसर सुशोभीकरण करण्यात येणार असून या माध्यमातून तालुक्यातील पर्यटनवाढीस चालना मिळणार आहे. या विकासकामांसाठी आमदार नितेश राणे यांच्याकडे भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. मेस्त्री यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. कणकवली तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून कणकवली विधानसभा मतदारसंघातील कणकवली तालुक्यातील कलमठ कलेश्वर मंदिर येथे गार्डन व परिसर सुशोभीकरण करणे तसेच कणकवली तालुक्यातील हायवे लगत असलेले व सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ओसरगाव तलाव व हरकुळ तलाव सुशोभीकरण यासाठी तब्बल पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पर्यटकांची वर्दळ वाढत हा भाग विकसित होत असताना गावातील स्थानिक लोकांना व्यवसाय निर्माण व्हावेत या दृष्टिकोनातून आमदार नितेश राणे यांनी राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी लावून धरली होती. आमदार नितेश राणे यांनी कणकवली तालुक्याला दिलेला या पाच कोटीच्या निधीमुळे कलमठ ,ओसरगाव,हरकुळ मधील ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं आनंदच वातावरण निर्माण झालं असून पर्यटन वाढीसाठी व कणकवली तालुक्याच्या विकासासाठी हे महत्त्वाचं पाऊल मानले जात आहे. आमदार नितेश राणे यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. ह्या कामासाठी भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री कलमठ सरपंच संदीप मेस्त्री , कलमठ उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, हरकुळ उपसरपंच सर्वेश दळवी यांनी विशेष मेहनत घेतली.











