हळवल मध्ये दोन डंपरसह दुचाकी ला अपघात ; एक जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील हळवल-शिरवल मार्गावर थांबलेल्या एका डंपरला मागाहून येणाऱ्या दुसऱ्या डंपरची धडक बसली. यात एका डंपर चालकाला दुखापत झाली. या घटनेत थांबलेला डंपर पुढे सरकल्याने तेथे उभी असलेली दुचाकी डंपरच्या चाकाखाली गेली. आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.

हळवल-शिरवल मार्गावर नऊ क्रशर आहेत. त्यामुळे या मार्गावर सातत्याने भरधाव वेगाने डंपर चालवले जातात. त्यामुळे या भागात सातत्याने अपघातांच्या घटना घडत आहेत. आज सकाळी नऊच्या सुमारास हळवल गिरण येथे एक डंपर (एमएच ०७ एजे ९०४५) थांबला होता. या डंपरचा मालकाने डंपरच्या समोर दुचाकी लावून रस्त्यालगत चालकाशी बोलत होता. या दरम्यान शिरवल येथून खडी वाहतूक करणारा दुसरा डंपर (एमएच ०७ सी ५१९९) भरधाव वेगाने जात होता. या डंपरे उभ्या असलेल्या डंपरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी समोरून दुसरे वाहन आल्याने त्याने आपला डंपर डावीकडे घेतला. मात्र यावेळी वेगावर नियंत्रण न राहिल्याने थांबलेल्या डंपरच्या मागील बाजूस दुसऱ्या डंपरने धडक दिली. या घटनेत मागील डंपरचा पुढील भाग थांबलेल्या डंपरच्या हौद्यामध्ये घुसला आणि मागील उंपरमधील चालक जखमी होऊन अडकून पडला होता. स्थानिकांनी तातडीने धाव घेऊन जखमी डंपरमधील चालकाला बाहेर काढून रूग्णालयात दाखल केले.

दरम्यान या घटनेवेळ धडक बसल्याने थांबलेला डंपर पुढे जाऊन रस्त्यालगतच्या चिऱ्यांमध्ये अडकून थांबला. त्यावेळी डंपरसमोर असणारी दुचाकी देखील डंपरखाली गेली. या अपघातग्रस्त डंपरचा चालक आणि मालक हे रस्त्याच्या बाजूला असल्याने ते सुदैवाने बचावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!