राणे – सामंत यांच्या कुडाळ मधील भेटीत नेमकं घडलंय काय ?

महायुती आढावा बैठकीकडे मंत्री सामंत यांची पाठ तर राणेंची सामंतांशी हॉटेलमध्ये बंद दाराआड चर्चा

किरण सामंत यांच्या उमेदवारीचा दावा पुन्हा प्रबळ

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूकीत महायुती चा उमेदवार नेमका कोण असणार ? याचीच एकमेव खमंग चर्चा सध्या तळकोकणात महायुती च्या आणि इंडिया आघाडीच्या सुद्धा राजकीय पटलावर जोरदार सुरू आहे.
भाजपाकडून केंद्रीयमंत्री नारायण राणे की शिवसेनेकडून किरण सामंत ? हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे.
किरण सामंत यांनी केलेल्या उमेदवारीचा दावा मागे घेत असल्याच्या पोस्ट चा इफेक्ट काल सिंधुदुर्गात दिसून आला. काल 3 एप्रिल रोजी भाजपा नेते केंद्रीय उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवसेना नेते राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची कुडाळमध्ये हिलट्रीट हॉटेलमध्ये मीटिंग झाली. सुमारे अर्धा तास राणे आणि सामंत यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू होती. कुडाळमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीची आढावा बैठक काल कुडाळमध्ये होती. मंत्री उदय सामंत काल खास मुंबईहून कुडाळ मध्ये आले. पण त्यांनी या बैठीककडे पाठ फिरवली.तर महायुती च्या आढावा बैठकीला न आलेल्या मंत्री उदय सामंत यांच्याशी भाजपा नेते केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची हॉटेल हिलट्रीटमध्ये गुप्त बैठक झाली. खास राणेंसोबत च्या या मिटिंगसाठी सामंत यांनी येण्यामागे काय कारण होते ? राणे आणि सामंत यांच्या या मीटिंगमध्ये नेमकी काय चर्चा झाली ? याचीच चर्चा सध्या सिंधुदुर्गात राजकीय पटलावर आहे. कुडाळ मध्ये 3 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसंदर्भाने शिवसेना भाजपा महायुती ची आढावा बैठक होती. नेमकं त्याच्या आदल्या रात्री 9 वाजता शिवसेनेचे संभाव्य उमेदवार किरण सामंत यांनी आपण लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले. किरण सामंत यांनी हे जाहिर करताना पुन्हा मोदी पंतप्रधान व्हावे आणि 400 पार हा नारा खरा ठरावा यासाठी माघार घेत असल्याचे जाहीर करत एक प्रकारे भाजपालाच पेचात टाकले असे म्हणावे लागेल. कारण महायुती चा संभाव्य उमेदवार म्हणून किरण सामंत यांनी करावी लागणारी सर्व मोर्चेबांधणी केलेली आहे. तरीही उमेदवारी जाहीर करण्यात होत असलेला विलंब असह्य होऊन किरण सामंत यांनी कदाचित ती पोस्ट केली असावी. मात्र किरण सामंत यांच्या त्या पोस्ट नंतर व्हायचा तो परिणाम झाला. राज्यात ठाकरे सरकार उलथवून सेना भाजपा युतीचे स्थिर सरकार आणण्यात महत्वाचा रोल असलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ किरण सामंत यांच्यासह रत्नागिरीतील शिवसेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्स वर चर्चा केली. दरम्यान किरण सामंत यांनी ती पोस्ट डिलीट केली. मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत किरण सामंत यांच्या त्या कृतीचे स्पष्टीकरण देत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचाच दावा असल्याचे ठामपणे सांगितले. दरम्यान कुडाळ मधील भाजपा कोअर मिटींगमध्ये महायुती च्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन आणि कानमंत्र केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्याना दिला. तर दुसरीकडे कुडाळमध्ये येऊनही महायुती च्या आढावा बैठकीकडे न फिरकता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर अद्याप शिवसेनेचाच दावा असल्याचे अगदी ठामपणे सांगितले. यावरून किरण सामंत हे लोकसभा उमेदवारीच्या स्पर्धेत प्रबळ दावेदार असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

error: Content is protected !!