फोंडाघाट बाजारपेठ महामानवांच्या जयजयकाराने दुमदुमली !
फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ भारतीय बौद्ध महासभा आयोजित विविध कार्यक्रम आणि भव्य मिरवणूक
फोंडाघाट (प्रतिनिधी) : अठराव्या शतकात माणसाला माणूसपण मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समाजातील प्रत्येक जण सक्षम होण्यासाठी शिक्षणाची कवाडे उघडणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे संघर्षमय जीवन, बहुजनांच्या उन्नतीसाठी स्वाहाकार यामधून महामानवांना समजून घेणे आज प्रत्येकासाठी अपरिहार्य आहे. हा महिना बहुजनांसाठी ऊर्जा देणारा, ज्यावेळी आपल्याला कुणी वाली नव्हता,त्यावेळी आपल्या संघर्षमय जीवनातून देशाच्या एकते साठी- एकात्मतेसाठी संविधानातून समानता आणण्याचा प्रयत्न या महामानवांनी केला. त्यांचे स्मरण- आचरण हीच आपल्या समाजाची त्यांना आदरांजली ठरावी, असे विचार आपल्या व्याख्यानातून प्रा सुचिता गायकवाड यांनी बुद्धविहार येथे व्यक्त केले.
जयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित या व्याख्यानमाले सह, यावेळी रांगोळी तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विकास मंडळ आणि महासभेचे सर्वश्री देवेंद्र कांबळे, जयंत जाधव, संतोष कदम, प्रा.संतोष आखाडे, सुमेधा जाधव,ऋतुजा जाधव, सुप्रिया जाधव, सुचिता जाधव इत्यादी पदाधिकाऱ्यांसह सिद्धार्थ नगरातील अबालवृद्ध ग्रामस्थ, नागरिक,तरुणाई उपस्थित होती. जयंती दिवशी सकाळी फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ व भारतीय बौद्ध महासभेचे धम्म ध्वजारोहण संपन्न झाल्यावर सूत्र पठण झाले. त्यानंतर नालंदा बुद्ध विहार ते होंडा एसटी स्टँड दरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात आली.अग्रभागी रथावर गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमातून त्यांना ठीक ठिकाणी अभिवादन केले जात होते.मिरवणुकीमध्ये शुभ्रवेष धारण केलेले समाजातील अबाल वृद्ध, महिला- पुरुष- तरुणाई मंडळाचे ध्वज घेऊन सहभागी झाले होते.महामानव आणि शिवाजी महाराज यांच्या जयकारांनी आणि भीमगर्जनेने बाजारपेठ दुमदुमून गेली.सायंकाळी सत्कार,विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण, मुला-मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम बुद्ध विहार येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले.












