आलिशान कारसह शिकारी पोलीसांच्या जाळ्यात
कणकवली (प्रतिनिधी) : खारेपाटण चेकपोस्टवर अवैध बंदुकीसह जिवंत काडतुसे सोबत बाळगलेल्या काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आलिशान कार सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. ही कारवाई 30 मे रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कणकवली पोलिसांनी केली. याबाबत कणकवली पोलीस निरीक्षक तडवी यांनीही दुजोरा दिला असून अधिक तपशील कायदेशीर कारवाई नंतर देऊ असे सांगितले. देवगड तालुक्यातील काहीजण त्या कारमधून अवैध बंदूक आणि जिवंत काडतुसे घेऊन प्रवास करत होते. खारेपाटण चेकपोस्टवर ड्युटीवर तैनात पोलीस अंमलदार यांनी त्या कारला थांबवून तपासणी केली असता आतमध्ये अवैध बंदूक जिवंत काडतुसे आणि कारमधून प्रवास करणारे आढळून आले.अद्याप लोकसभा निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने सर्व परवानाधारक बंदुका शासनाकडे जमा आहेत.त्यामुळे खारेपाटण चेकपोस्टवर सापडलेली ही अवैध बंदूक आणि जिवंत काडतुसे शिकारीच्या उद्देशाने सोबत नेल्याची शक्यता आहे.तसेच अन्य कोणत्या उद्देशाने जिवंत काडतुसे व बंदूक बाळगली त्यादृष्टीने पोलीस चौकशी करत आहेत.











