कणकवली (प्रतिनिधी) : एस एम जुनियर कॉलेज व व्यवसाय अभ्यासक्रम, कणकवली येथे नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा उत्साहात पार पडला. प्रशालेच्या कै. सदानंद पारकर सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे सचिव डी. एम. नलावडे, प्राचार्य जी. एन. बोडके उपप्राचार्य आर.एल. प्रधान, पर्यवेक्षक जी.ए कदम व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कदम शिक्षक यांनी शुभेच्छा देताना विद्यार्थ्यांना एस.एम. च्या यशाची परंपरा अविरत ठेवण्यासाठी तुमची जिद्द आणि चिकाटी महत्त्वाची आहे असे प्रतिपादन केले. प्रधान शिक्षक यांनी कोणतेही क्षेत्र निवडा पण त्याची निश्चिती आजच करून त्यासाठी कष्टाची तयारी ठेवा असा सल्ला दिला. तर बोडके शिक्षक यांनी माध्यमिक विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज एकत्र असल्याकारणाने शिस्तीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्याच बरोबर त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
सचिव नलावडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांच्या दहावीच्या गुणांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या अडचणी, करियर निवड, आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि ती करावी लागणारी धडपड याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.डी. हिर्लेकर व आभार एम. आर. पाटील यांनी मानले.













