चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील कांदळगाव येथे आज सकाळी एक खवले मांजर कुंपणाला लावलेल्या जाळ्यात अडकल्याची माहिती स्वप्निल गोसावी यांनी मालवण वन परिमंडळाचे अधिकारी श्रीकृष्ण परीट यांना दिली. सदर खवले मांजर संतोष पारकर हे गुरे चारण्यासाठी गेले असता त्याच्या नजरेस पडले त्यावेळी त्यांनी युथ बिट्स फॉर क्लायमेट चे सदस्य स्वप्निल गोसावी यांना याची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व पार्थ डिचवलकर यांना सांगून वनकर्मचारी यांच्या मदतीने सुखरूप सुटका करून वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट यांचे ताब्यात दिले.
खवले मांजर जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असून समाजात असलेल्या गैरसमजामुळे दुर्मिळ होत चाललेली वन्य जीवांची प्रजात आहे. खवले मांजर वन्यजीव अधिनियम 1972 मधील शेड्युल एक मध्ये असून त्याला डिवचने पकडणे त्याची शिकार करणे हा गुन्हा आहे. अशी माहिती यावेळी श्रीकृष्ण परिट यांनी दिली.
सदरचे बचाव कार्य उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड, वनक्षेत्रपाल कुडाळ संदीप कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण परीट परिमंडळ वन अधिकारी मालवण, अनिल परब वनकर्मचारी, ग्रामस्थ संतोष पारकर, पार्थ डीचवलकर, नारायण मेस्त्री , लवेश आयकर तसेच युथ बिट्स फॉर क्लायमेट चे सदस्य स्वप्निल गोसावी, दर्शन वेंगुर्लेकर यांचे उपस्थित पार पडले.