अंबर गृहप्रकल्पाच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी तेजस घाडीगांवकरसह चौघांचा जामीन फेटाळला

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : जानवली येथे अंबर गृहप्रकल्पाच्या नावाखाली गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी तेजस सागर घाडीगांवकर ( रा. फोरबंदर, माझगाव मुंबई ) , विनोद गिरधर परमार ( रा.घोडपदेव रोड मुंबई ), एलटर पीटर नऱ्होना, निलेश विश्वनाथ अवघडे ( दोघेही रा. वडाळा पश्चिम मुंबई ) यांचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश भारुका यांनी फेटाळला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी यशस्वी युक्तिवाद केला. कणकवली तालुक्यात जानवली येथे अंबर गृहपक्रल्पाचे होर्डिंग्ज आणि वेबसाईट बनवून ग्राहकांकडून लाखो रुपये उकळून ते पैसे शेअर मार्केटमध्ये वळवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची फिर्याद शामल मंगेश तळदेवकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली होती. शामल यांनी स्वतःची 14 लाखांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमुद केले होते. शामल यांच्या फिर्यादीनुसार वरील चारही आरोपींविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात भा. दं. वि.420 , 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पीएसआय अनिल हाडळ यांनी केला होता. या गुन्ह्यात आरोपींनी जामीन अर्ज सादर केला होता. या जामीन अर्जाला हरकत घेताना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांनी आरोपींवर यापूर्वीही फसवणुकी चे गुन्हे दाखल आहेत, मोठ्या रक्कमांची अनेक लोकांची फसवणूक केलेली आहे, लोकांची फसवणूक करून रक्कमा स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्या आणि शेअर मार्केट मध्ये पैसे वळवले आधी बाबी न्यायालयासमोर उजेडात आणत आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद केला. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत चारही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

error: Content is protected !!