नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल ; आरोपींना न्यायालयात हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी
कणकवली (आनंद तांबे) : नांदगाव गावचे सरपंच रविराज उर्फ भाई धोंडू मोरजकर यांची मोटरसायकल नांदगाव तिठा येथे अडवून ” तुझा मोबाईल घेवून जाणार तुला काय करायचे ते कर ” असे सांगत संशयित आरोपी कमलेश सुरेश मोरये यांनी शर्टाच्या खिशातील मोबाईल काढून घेतला . त्यावेळी श्री. मोरजकर यांनी माझा मोबाईल तुला का देवू ? असे सांगितले असता आरोपी कमलेश मोरये याने फिर्यादींच्या कानाखाली मारत शिवीगाळ देवून जीवेमारण्याची धमकी दिली. तसेच संशयित आरोपी सुरेश मोरये याने बांबुची काठी घेवून आल्यावर कमलेश मोरये याने मोरजकर बरगडीच्या खाली दगड मारुन दुखापत केली. तसेच फिर्यादींचे भाऊ भुपेश मोरजकर यांच्या खांदयावर व पाठीवर बांबू मारत दुखापत केली आणि तुला बघुन घेतो , अशी धमकी दिली. याप्रकरणी कणकवली पोलिसांनी संशयित आरोपी बाप – लेकाला अटक करुन न्यायालयात हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांनी दिलेल्या फिर्यादित संशयित आरोपी कमलेश सुरेश मोरये (३८) , सुरेश अर्जुन मोरये (६२) दोन्ही राहणार नांदगांव तिठा ता. कणकवली हे दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असुन त्यांचेविरुध्द गावातील लोकांच्या नेहमी तक्रारी असतात. मागील सुमारे ६ महिन्यांपुर्वी नांदगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे मी, व ग्रामसेवक मंगेश राणे असताना माझ्याकडे कमलेश मोरये व सुरेश मोरये असे दोघे येवुन त्यांनी मला नांदगाव तिठा येथे अनाधिकृत बांधलेला दुकान गाळा नोंदवुन त्याचा घरपत्रक उतारा देण्यास सांगितले. त्यावेळी मी त्यांना तुम्ही एक रितसर अर्ज व त्यासोबत स्टॅम्पवर शपथपत्र लिहून द्या, लगेच गाळ्याची नोंद करुन घरपत्रक देतो असे सांगितले. त्यावेळी वरील दोन्ही आरोपींनी मला दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली होती, त्याबाबत मी दिलेल्या तक्रारीवरुन कणकवली पोलीस ठाणे येथे त्यांचेविरुध्द गुन्हा दाखल आहे. त्याच दिवशी कमलेश मोरये याने रात्री उशीराने त्याचा मोबाईल आम्ही नेला अशी खोटी तक्रार आमच्याविरुध्द दिलेली होती, त्यानंतर काही दिवसांनी कमलेश मोरये याने यारुच्या नशेत मला फोन करुन “माझा मोबाईल तुच नेला आहेस, तुझा मोबाईल कसा घेवून जातो ते बघ” अशी धमकी दिली होती. परंतु मी सरपंच पदावर असल्याने व तो दारुच्या नशेत बोलत असल्याने त्याच्या बोलण्याकडे मी दुर्लक्ष केला होता.
दरम्यान , २८ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास मी व माझा भाऊ ऋषिकेश मोरजकर असे आम्ही माझ्या मोटार सायकलने घरी जात असताना मांदगाव तिठा येथे संशयित आरोपी कमलेश मोरये याने माझी मोटार सायकल अडवली, “तुझा आता मोबाईल घेवून जाणार, तुला काय करायचे ते कर” असे बोलुन माझ्या शर्टाच्या वरच्या खिशातील माझा मोबाईल घेवु लागला, त्यावेळी मी त्यास “माझा मोबाईल मी तुला का देवु?” असे सांगितले असता त्याने मला माझ्या कानाखाली हाताच्या थापटाने चापट मारुन तो शिवीगाळी करु लागला, त्यावेळी मी व माझा चुलत भाऊ ऋषिकेश असे आम्ही मोटार सायकलवरून खाली उतरलो. तेव्हा त्या ठिकाणी कमलेशचे वडील सुरेश मोरये हा हातात बांबुची काठी घेवुन आल्यावर कमलेश मोरये याने मला शिवीगाळी करीत तेथील दगड हातात घेवून तो दगड माझ्या डाव्या बाजुला बरगडीच्या खाली मारुन दुखापत केली. तेंव्हा त्या वेळेस माझा सख्खा भाऊ भुपेश धोंडु मोरजकर हे मला त्यांच्यापासुन वाचविण्यासाठी आले असता सुरेश मोरये याने त्याच्या हातातील बांबुची काठी भाऊ भुपेश याच्या डाव्या खांद्यावर त पाटीवर मारुन दुखापत केली. तेव्हा त्याच्या हातातील काठी काढून घेण्यासाठी मी गेलो असता कमलेश मोरये याने माझ्या खिशातील मोबाईल काढून घेण्यासाठी मला हाताच्या थापटाने व लाथा बुक्याने मारहाण केली, व माइया खिशातील माझा मोबाईल काढून घेतला. “तु आता काय करायचे ते करून घे, तुला बघुन घेतो” अशी धमकी दिली, व ते दोघे तेथुन निघुन गेले. त्यानंतर मी घटनेबाबत लगेच कणकवली येथे जावून पोलीसांनी कळवून मी व माझा भाऊ भूपेश असे आम्ही आम्हाला झालेल्या दुखापतीवर उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे जावून उपचार करून घेतले. अशी फिर्याद नांदगांव सरपंच भाई मोरजकर यांनी नोंदवली आहे. त्यानुसार कणकवली पोलीसांनी संशयित आरोपी कमलेश सुरेश मोरये (३८) , सुरेश अर्जुन मोरये ( ६२) दोन्ही राहणार नांदगांव तिठा ता. कणकवली यांच्या विरुध्द भा.द.वी कलम ३२७, ३२४ , ३४१ , ३२३ , ५०४ , ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली प्रभारी निरिक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अनिल हाडळ , पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे करीत आहेत.
दरम्यान कणकवली पोलिसांनी संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळताच आरोपींच्या नांदगांव तिठा येथील घराची झाडझडती करीत गुन्ह्यात वापरलेली बांबूची काठी , दगड पोलीसांनी जप्त केले असून सरपंच रविराज मोरजकर यांचा चोरीस गेलेल्या मोबाईलची शोधमोहिम पोलीसांनी राबवली.
आरोपींवर कठोर कारवाईची ग्रामस्थांची मागणी नांदगाव तिठा दोन्ही संशयित आरोपी हे विविध घटनांमध्ये नागरिक , व्यापारी , रिक्षा चालक यांना त्रास देवून शिवीगाळ , मारहाण , नाहक तक्रारी करत आहेत. यापूर्वी कणकवली पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत. मद्यप्राशन करुन नाहक सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवणा-या या पिता – पुत्रावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नांदगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या घटनेच्या पार्श्वभुमीवर करण्यात आली आहे. संशयित आरोपी फोटो सुरेश मोरये , कमलेश मोरये