तिलारी नदीपात्रात सापडला होता मृतदेह
मृताच्या उजव्या हातावर बालाजी लक्ष्मी ज्योती आणि डाव्या हातावर रेणुका नाव गोंदलेले
दोडामार्ग (प्रतिनिधी) : तिलारी नदीपात्रात मणेरी येथे 30 ते 40 वर्षे वयाच्या अज्ञात पुरुषाचा मृतदेह 4 एप्रिल रोजी सापडला होता. पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा या शक्यतेने सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली होती. मात्र पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यू हा गळा आवळल्याने गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोडामार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस निरीक्षक ओतारी यांनी माहिती देताना सांगितले की, 4 एप्रिल रोजी तिलारी नदीपात्रात अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. त्याबाबत आकस्मिक मृत्यू ची नोंद करून मृतदेह पोस्ट मार्टेम साठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. सदर मृतदेहाच्या पी एम रिपोर्टनुसार त्या अज्ञात पुरुषाचा गळा आवळून गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गळा आवळून खून करून नंतर त्याचा मृतदेह तिलारी नदीपात्रात फेकण्यात आला. याबाबत पीएसआय आशिष भगत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खून करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नदीपात्रात फेकल्याबाबत आयपीसी 302 सह अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताच्या गळ्यावर लालसर काळपट व्रण होते. तसेच मयताच्या उजव्या हातावर बालाजी लक्ष्मी ज्योती आणि डाव्या हातावर रेणुका असे गोंदलेले आहे. अशा वर्णनाची पुरुष व्यक्ती मिसिंग ची असल्यास दोडामार्ग पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











