कणकवली (प्रतिनिधी) : सध्या राजकीय प्लॅटफॉर्मवर “सु” नियोजन करत “शांत” पणे युवा सेल च्या माध्यमातून आपली पकड मजबूत करत असलेल्या जिल्हास्तरीय युवा पदाधिकाऱ्यामध्ये आणि त्या पक्षाच्या तालुकास्तरीय बेसिक पदाधिकाऱ्यामध्ये एका आंदोलनाच्या विषयावरून तू तू मै मै होत शाब्दिक युद्ध जुंपले आणि याची एकच चर्चा दिवसभर कणकवली विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात चांगलीच रंगली. त्याचे झाले असे की, त्या पक्षाच्या युवा सेल कडून एका विषयावरून पुरवठादारावर कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. शासकीय अधिकाऱ्यांनी समाजाचे कल्याण करण्याऐवजी संगनमताने पुरवठादाराचे आर्थिक कल्याण केले आणि हे सर्व एका राज्यस्तरीय लोकप्रतिनिधीच्या हस्तक्षेपाने झाल्याचा आरोप आंदोलनाचा इशारा देताना देण्यात आला होता. इशारा देण्यात आलेल्या या आंदोलनाच्या नियोजनाबाबत आज राष्ट्रीय महामार्गालगत च्या कार्यालयात पक्षाच्या युवा सेल च्या पदाधिकाऱ्यांची बैठकही आयोजित करण्यात आली. पण त्या नियोजित आंदोलनाबाबत पक्षाच्या बेसिक संघटनेला कुठेच वाव नसल्याची खंत दिसून आल्याने आंदोलन नियोजन बाजूला पडून बेसिक आणि युवा सेलमध्ये श्रेयवाद सुरू झाला. ह्या “का”य बरोबर “न्हाया” असे म्हणत बेसिक च्या तालुकास्तरीय पदाधिकाऱ्याने याबाबत उघड नाराजी व्यक्त केल्याने आंदोलन नियोजन बाजूलाच पडले आणि अंतर्गत मतभेद उफाळून आले. या वादाचीच चर्चा आज कणकवली विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याभरात सुरू आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बेसिक आणि युवा सेल मधील श्रेयवादाला फुटलेल्या तोंडाचा परिणाम येत्या विधानसभा निवडणूकीत पडणार की नाही हे काळच सांगू शकेल
आंदोलन श्रेयवादावरून बेसिक आणि युवा सेल मध्ये जुंपली











