डाॅ. मिलिंद कुलकर्णी यांची महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड

आचरा (प्रतिनिधी) : तळेरे येथील प्रतिथयश डॉक्टर तसेच जिल्ह्यातील साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविणारे अष्टपैलू व्यक्तीमत्व डॉ.मिलिंद उल्हास कुलकर्णी यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी सत्तावीस वर्षापूर्वी डॉक्टरी पदवी मिळविल्यानंतर कोकणात तळेरे येथे येऊन पहिले रुग्णालय सुरू केले. डॉ.ऋचा कुलकर्णी या पती पत्नी जोडीने रुग्ण सेवेला सुरुवात केली. त्यानंतर अल्पावधीतच त्यांनी अभ्यासू वृत्ती, उत्तम संभाषण कौशल्य, वाचन, लेखन, वक्तृत्व या कौशल्य गुणांमुळे जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली. एक उत्तम डॉक्टर म्हणून सुपरिचित झालेच त्याचबरोबर विविध विषयांवरती अतिशय प्रभावी व्याख्याने सादर करण्याचा छंद जोपासत आले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत नाट्य, सिनेमा, साहित्यिक, लेखक, कवी,विचारवंत, अभ्यासक यांच्याशी थेट खूप जवळचे संबंध असल्यामुळे मान्यवर मंडळी त्याच्या निवासस्थानी सतत भेटीला येत असतात.

तळेरे सारख्या ग्रामीण भागात साहित्य संस्कृती रुजावी, वाढावी आणि जोपासली जावी यासाठी जेष्ठ कवी,गझलकार कै.मधुसूदन नानिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संवाद परिवाराच्या माध्यमातून साहित्यिक, सांस्कृतिक चळवळ सुरू केली. नानिवडेकर यांच्या अकाली निधनानंतर आपल्याच रुणालयाच्या परिसरात कै. मधुसूदन नानिवडेकर यांच्या स्मरणार्थ “मधु कट्टा” उभारुन त्या कट्ट्यावरती असंख्य नामवंत साहित्यिक व अन्य क्षेत्रातील व्यक्तीच्या सुरेल मैफिली जागवल्या. त्यामुळे तळेरे येथे खऱ्या अर्थाने साहित्य चळवळ सुरू झाली. संवाद परिवार या संस्थेची खरी मुहूर्तमेढ संस्थापक डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनीच रोवली आहे. तसेच सातत्याने विविध उपक्रम सातत्याने होऊ लागले.

“कोकणचो डॉक्टर” हे त्याचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. ते कोकणात खऱ्या अर्थाने रुळले आणि कोकणचे डॉक्टर म्हणून ओळखले जावू लागले. डाॅ.कुलकर्णी यांच्या याच भरीव योगदानाची आणि त्यांच्या अभ्यासू व्यक्तीमत्त्वाची दखल महाराष्ट्र राज्य स्तरावरती घेतली गेली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे आणि इतर संचालकांनी घेऊन डॉ.मिलिंद कुलकर्णी यांच्या सारख्या प्रतिभावंत व्यक्तीची निवड महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड करून योग्य सन्मान केला आहे.

डॉ.मिलिंद कुलकर्णी यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवडीबद्दल त्यांच्यावरती सर्व स्तरातून अभिनंदन वर्षाव केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!