पतसंस्थेच्यावतीने चौके पंचक्रोशीतील सभासदांना भेटवस्तू वाटप
चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चौके येथे 1999 साली पंचक्रोशीतील साळेल गावातील कैलासवासी सोनू गावडे यांच्या तेव्हाच्या संकल्पनेतून व आंबेरी गावचे सुपुत्र शिक्षक कृष्णा करलकर,नांदरुख येथील अशोक शृंगारे, चोके येथील सुरेश चौकेकर तसेच गावातील पंचक्रोशीतील सहकार क्षेत्रातील अन्य मान्यवरांच्या पुढाकाराने त्यावेळी स्थापना करण्यात आलेल्या वैभव लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित चौके ला नुकतीच पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त चौके बाजारपेठीतील पतसंस्थेच्या कार्यालयात छोटेखाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी या पतसंस्थेचे संस्थापक, विद्यमान चेअरमन, व्हाईस चेअरमन उपस्थित संचालक यांचा योग्य तो सन्मान करण्यात आला.
यावेळी पतसंस्थेचे संस्थापक कृष्णा करलकर, पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन सुरेश चौकेकर तसेच उपस्थित संचालकांकडून पंचक्रोशीतील पतसंस्थेच्या सर्व सभासदांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. वैभवलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित चौके संस्थापक कृष्णा करलकर यांनी पतसंस्था स्थापनेपासूनचा गेल्या पंचवीस वर्षातील कार्यकाल व कामगिरिचा अहवाल उपस्थित सर्व सभासद व ग्रामस्थ यांच्यासमोर मार्गदर्शन करताना मांडला. पतसंस्थेच्या सुरुवातीला एक दोन हजार रुपये पासून पन्नास हजार पर्यंतचे देण्यात येणारे कर्ज आजच्या घडीला साडेतीन लाखापर्यंत देण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच पतसंस्थेचे चेअरमन सुरेश चौकेकर यांनीही आपले मनोगत मांडताना सुरवातीच्या काळात पतसंस्थेला सहकार्य लाभलेल्या दिवंगत संचालकांच्या प्रति स्मृती जागवून श्रद्धांजली वाहिली.. गेल्या पंचवीस वर्षात चांगले सहकारी संचालक सभासद-कर्मचारी लाभले तसेच चौके तसेच पंचक्रोशीतील पतसंस्थेच्या सर्व सभासदांचे भरीव सहकार्य लाभले व कर्जदारांनी वेळीच कर्ज भरल्याने मी आता संस्थेचे कामकाज करताना कोणतीही अडचण भासली नाही गेल्या पंचवीस वर्षात एकही थकीत कर्जदारावर कार्यवाही केली नाही. या पतसंस्थेच्या सभासद कर्जदार तसेच संचालक व कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे पतसंस्थेची यशस्वी वाटचाल करता आली याचा आनंद आहे. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष अशोक शृंगारे तसेच विजय डगला, नितीन गावडे यांनी आपले विचार मांडत पतसंस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पतसंस्थेचे विजय गावकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत उपस्थितांचे आभार मानले.












