धीरज मेस्त्री यांचे “त्या ” धोकादायक वीजवाहिन्यांविरोधात उपोषण

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ सुतारवाडी पिंपळपार येथील सभामंडपावरून जाणाऱ्या धोकादायक उच्चदाब विद्युतभारित वाहिन्यांमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन व संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षाविरोधात ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी उद्या 26 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे.

सदर ठिकाणी दररोज सुमारे 100 ते 150 ग्रामस्थांचा नियमित वावर असतो. मात्र, या गंभीर धोक्याबाबत वारंवार निवेदन, पत्रव्यवहार, स्थळ पाहणी तसेच कायदेशीर नोटीस देऊनही महावितरण व संबंधित विभागांकडून केवळ दिखाऊ व तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्याचा आरोप धीरज मेस्त्री यांनी केला आहे.ठेकेदारांच्या बोगस व निष्काळजी विकासामुळे थेट सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची तीव्र भावना त्यांनी व्यक्त केली. अशा प्रकारचा विकास स्वीकारार्ह नसून, यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी, समाजाच्या सुरक्षिततेसाठी, नागरिकांच्या जीवित हक्कासाठी आणि ठेकेदार संस्कृतीच्या विरोधात हे उपोषण करण्यात येणार आहे. हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती अथवा विभागाच्या विरोधात नसून, गावाच्या व येणाऱ्या पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी असल्याचेही मेस्त्री यांनी स्पष्ट केले.
सर्व सुजाण ग्रामस्थ, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी या आंदोलनास प्रत्यक्ष उपस्थित राहून नैतिक पाठिंबा द्यावा, असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
“आज जर आपण शांत राहिलो, तर उद्या एखादी दुर्घटना घडल्यास फक्त पश्चात्ताप उरेल,” असे भावनिक आवाहनही धीरज मेस्त्री यांनी केले आहे.

error: Content is protected !!