आंबे वाहतूक करताना पेण येथे एच.पी.गॅस गाडी आणि बोलेरो पिकअप मध्ये भीषण अपघात

विवाहिता ठार पती गंभीर जखमी ; दोघेही देवगड तारामुंबरी येथील

देवगड (प्रतिनिधी) : देवगड येथून वाशी मार्केट येथे आंबे घेवून जाणा-या महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीचा मुंबई गोवा महामार्गावर पेण नजिक हमरापूर फाटा येथे एच्.पी.गॅस ट्रकला धडक देवून झालेल्या भीषण अपघातात देवगड तारामुंबरी येथील स्पृहा सुमित खवळे(२४) ही विवाहित महिला जागीच ठार झाली असून तिचा पती सुमित चंद्रकांत खवळे(२८) हा गंभीर जखमी झाला आहे.हा अपघात पेण नजिक हमरापूर फाटा ब्रीजवर बुधवारी पहाटे ४.१५ वा.सुमारास झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, देवगड तारामुंबरी येथील सुमित चंद्रकांत खवळे(२८) हा मंगळवारी रात्री ८ वा.सुमारास महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीने आंबे घेवून मुंबई येथे जात होता.त्याच्यासमवेत त्याची पत्नी स्पृहा सुमित खवळे(२४) ही होती.बुधवारी पहाटे ४.१५ वा.सुमारास मुंबई गोवा महामार्गावर पेण नजिक हमरापूर फाटा ब्रीजवर एच्.पी.गॅस गाडीला बोलेरो गाडीची मागून जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात स्पृहा हिचा जागीच मृत्यू झाला तर बोलेरोचालक स्पृहा हिचा पती सुमित हा गंभीर जखमी झाला आहे.अपघातस्थळी दोन्ही वाहने एकमेकांमध्ये अडकून बसल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर काही काळ वाहतुक ठप्प झाली होती.अपघातग्रस्तांना कल्पेश ठाकूर यांनी आपल्या रूग्णवाहिकेतून तात्काळ उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.दादर सागरी पोलिस व पेण पोलिसांनी घटनास्थळी जावून अडकलेल्या दोन्ही वाहनांना बाजुला करून वाहतूक सुरळीत केली.

बोलेरो गाडीचालक सुमित खवळे हा दोन महिन्यापुर्वीच मुंबईहून गावी आला होता.त्याची पत्नी स्पृहा ही मुंबईत नोकरीस होती.कांजूरमार्ग येथे ते राहत होते. स्पृहा ही दोन दिवसापूर्वीच गावी तारामुंबरी येथे आली होती अशी माहिती नातेवाईकांनी दिली.सुमित हा मंगळवारी रात्री ८ वा.सुमारास बोलेरो पिकअप गाडीमध्ये आंबे भरून तो वाशी मार्केट येथे जात होता.त्याच्यासमवेत त्याची पत्नीही मुंबईला जात होती त्यांचा छोटा मुलगा कार्तिक हा तारामुंबरी येथे घरी होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!