सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकार पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी अपेक्षेप्रमाणे चुरशीचे मतदान झाले आहे. २९८२ पैकी २८०४ मतदारांनी मतदान केले आहे. ९४.०३ टक्के एवढे मतदान झाले आहे. १५ संचालक पदासाठी ३२ उमेदवाराने भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. दरम्यान, उद्या (सोमवारी) सकाळी ९ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृहात मतमोजणी होणार आहे.
सत्ताधारी गटाचे भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल विरुद्ध परिवर्तन सहकार पॅनेल यांच्यात थेट लढत देणारी ही निवडणूक झाली. जिल्ह्यातील आठ तालुक्यांत आठ मतदान केंद्रे यासाठी निश्चित करण्यात आली होती. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. दोन्ही गटांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. एकमेकांवर भ्रष्टाचाराचे गंभिर आरोप प्रचारा दरम्यान करण्यात आले होते. भाग्यलक्ष्मी पॅनेलने सत्ता कायम राखण्याचा तर विरोधी पॅनेलने परिवर्तन होणार असल्याचा दावा केला होता. लोकसभा, विधानसभा निवडणुकी प्रमाणे जिल्ह्यातील आठही मतदान केंद्राबाहेर दोन्ही पॅनेलचे टेबल लावण्यात आली होती. यावरून किती काटे की टक्कर देणारी निवडणूक झाली आहे, हे स्पष्ट होते.