मानवाधिकार असोसिएशनच्या राष्ट्रीय सचिव राजेश्री प्रशांत नारकर-चांदूरकर यांचे विशेष प्रयत्न
वैभववाडी (प्रतिनिधी): विवाहात फसवणूक, शिवीगाळ, मारहाण व शारीरिक छळ केल्याप्रकरणी मला मदत करा अन्यथा माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईन. अशा आशयाचे निवेदन विवाहित पिडिता सुप्रिया सचिन आरडे-मोरे यांनी मानवाधिकार असोसिएशनच्या राष्ट्रीय सचिव राजेश्री प्रशांत नारकर-चांदूरकर यांना दिले आहे. या प्रकरणाची गांभिर्याने मानवाधिकार असोसिएशनने दखल घेत संबंधित पिडित विवाहितेला न्याय मिळवून दिला आहे. सविस्तर माहिती अशी की, सचिन शंकर आरडे हे पिडितेचे कायदेशीररित्या पती आहेत. त्यांनी २४ एप्रिल २०१९ रोजी लग्न केले. हा विवाह मुंबई येथे पार पडला. विवाह सोहळ्यादरम्यान तिचा पति खूप बालिश वागत होता. याबाबत पिडितेच्या आई, वडिलांना शंका आली. त्यांनी या वागणुकीबद्दल पिडितेच्या सासू, सासरा आणि भावाला विचारले. त्यांनी आपला मुलगा लाजाळू असल्याचे सांगितले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पती तिच्याशी बोलत नव्हता. आणि स्वतःला आपल्या पत्नीपासून दूर ठेवत होता. त्याची आई त्याला अन्न खाणे, प्रातविधी, आंघोळ करणे यासारख्या मूलभूत क्रिया करण्यास मदत करत होती. पिडीतेच्या स्वतःच्या काकांनी विश्वासघात केला आहे. त्यानीच लग्नाचा प्रस्ताव आणला होता. पिडितेच्या वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला. त्यांनी मुलाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तिच्या काकांनी मुलाबद्दल सर्व खात्री दिली होती. वडिलांनी स्वतःच्या भावावर विश्वास ठेवून सहमती दिली. लग्नानंतर सहा महिन्यांनी पिडितेला हे सहन होत नव्हते. तिने तिचे वडिल दत्ताराम मोरे यांना सर्व प्रकार सांगितला. पिडितेच्या वडिलांनी आपला भाऊ चंद्रकांत मोरे यांना याप्रकरणी वारंवार फोन केला परंतु, त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला. दरम्यान पिडितेने आपले सासरे शंकर सखाराम आरडे यांच्याकडे न्याय मागितला परंतु, तिचे सासरे उत्तर देत नाहीत. आणि तिच्या आईवडिलांचा अनादर होईल असे सांगून तिला गप्प बसण्यास सांगितले. पिडितेला तिच्या वडिलांकडे घरी जायचे होते. परंतु तिचे सासरे शंकर आरडे आणि सासू जयश्री आरडे यांनी तिला जाऊ दिले नाही. तिचा दिर सुधीर आरडे यांनी तिचा शारीरिक छळ केला. सर्व मूलभूत गरजांपासून वंचित ठेवून तिला धमाकवले. या सर्व जाचाला कंटाळून ती नैराश्यात गेली. आत्महत्या करणार असल्याचे तिने सांगितले. अखेर पिडितेने नोव्हेंबर २०२२ मध्ये सासरचे घर सोडले. दरम्यान पिडितेने मानवाधिकार असोसिएशनच्या राष्ट्रीय सचिव राजेश्री प्रशांत नारकर-चांदूरकर यांना याप्रकरणी निवेदन देऊन मला मदत करा. अन्यथा माझ्या जीवाचे बरेवाईट करून घेईन. अशा आशयाचे निवेदन दिले आहे. या प्रकरणाची मानवाधिकार असोसिएशनने गांभिर्याने दखल घेत न्याय मिळवून देत, सासरच्यांकडून पिडितेला ३ लाख रुपये देण्याचे ठरले आहे. तसेच पिडित विवाहितेला घटस्फोट मिळवून न्याय मिळवून दिला.













