वायरीत महिलेकडून गोवा बनावटीची दारू जप्त

मालवण (प्रतिनिधी): मालवण शहरातील वायरी वराडकरवाडी येथे पोलिसांनी काल सायंकाळी टाकलेल्या छाप्यात गोवा बनावटीची सुमारे ७ हजार १०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला. वायरी परिसरात सायंकाळी पोलीस गस्त घालत असता वराडकरवाडी येथे एक महिला दारू विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहायक पोलिस निरीक्षक बंगडे, पोलीस उपनिरीक्षक शिवराम झांजुर्णे यांनी अचानक छापा मारला. यात हर्षदा खुरंदळे या महिलेकडे असलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या ८८ बाटल्या सापडून आल्या. या सर्व बाटल्या जप्त करत आरोपी खुरंदळे हिच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!