खारेपाटण (प्रतिनिधी ) : ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्याला दरवर्षी ऑनलाईन पीक पाणी नोंद करणे अवघड जात असून मोबाईल नेटवर्क तसेच नोंदणीची तांत्रिक माहिती सर्व सामान्य शेतकऱ्याला समजत नसल्याने विशेष करून काजू व आंबा फळ बागायती या पिकांची तरी ऑनलाईन ई – पीक पाणी नोंद किमान दर पाच वर्षांनी करण्यात यावी. अशी मागणी कुरंगवणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच तथा भाजप युवा किसान मोर्चाचे खारेपाटण – तळेरे विभागिय अध्यक्ष आणि कट्टर राणे समर्थक पप्पू ब्रम्हदंडे यांनी लेखी निवेदनाद्वारे तहसील कार्यालयाकडे केली आहे.
याबाबत सरपंच श्री पप्पू ब्रम्हदंडे यांनी आज कणकवली नवनियुक्त तहसीलदार श्री दीक्षांत देशपांडे यांची कणकवली येथे सदिच्छा भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. व आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार श्री देशपांडे यांना सादर केले.यावेळी त्यांचे समवेत कुरंगवणे गावचे ग्रामस्थ सचिन कदम हे उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्याला जिरायती,बागायती व खरीप रग्बी पिकांची नोदणी करणे बंधनकारक केल्याने अडचणीचे ठरत असून हा केवळ कोकणातील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रश्न नसून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.त्यामुळे भात पीक नोदणी दरवर्षी करणे ठीक आहे.मात्र आंबा काजू ई पीक पाहणी नोंद दरवर्षी ऑनलाईन न करता ती दर पाच वर्षांनी करण्यात यावी. व तसा आदेश शासनाकडून पारित करून शेतकऱ्याना दिलासा देण्यात यावा अशी मागणी देखील कुरगवणे – बेर्ले सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांनी शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.













