सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम विश्वकर्मा ही चांगली, महत्वाची योजना आणली आहे. स्वातंत्र्यानंतर दुर्लक्षित राहिलेल्या देशातील विश्वकर्मा यांना विकसित करण्यासाठी ही योजना आणली गेली आहे. यासाठी वेगवेगळ्या विभागांनी अनेक महिने अभ्यास केला. त्यानंतर ही योजना लागू करण्यात आली आहे. योजनेच्या माध्यमातून विश्वकर्मा यांच्या दारात लक्ष्मी दारात आली आहे. २०३० मध्ये देश महासत्ता बनण्यासाठी देशातील विश्वकर्मा यांचे योगदान महत्त्वाचे राहणार आहे. त्यामुळे योजनेचा फायदा घेवून जिल्ह्यातील विश्वकर्मा बांधवांनी उद्योजक बनावे. आपली आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन केंद्रीय लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले.
सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे केंद्राच्या एम एस ई बी विभागाच्यावतीने केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पी एम विश्वकर्मा योजनेच्या प्रचारासाठी परिसंवाद आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पारंपरिक शिल्पकार आणि कारागिरांच्या मदतीसाठी केंद्र सरकारच्या या योजनेबाबत माहिती देण्यासाठी आयोजित कार्यक्रमाचे मंत्री राणे यांनी दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय अतिरिक्त सचिव डॉ रजनीश, व्यवस्थापक ए आर गोखे, सेक्रेटरी अतिश सिंग, खादी विभागाच्या आर विमला, अनुजा बापट, अतिरिक्त विकास अधिकारी अश्विनी लाल, रुक्मिणी अत्री, नरेंद्र, कार्तिकेय सिन्हा, बँक ऑफ महाराष्ट्र जनरल मॅनेजर सुजित नायर, आ नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, परिविक्षाधीन आय ए एस विशाल खत्री, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजन तेली, अजित गोगटे, लीड बँक व्यवस्थापक मुकेश मेश्राम, राजकुमार सिंघ, आनंद मेस्त्री आदी उपस्थित होते.












