खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण २६ परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या स्पर्धा परीक्षेत शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयाचा इयत्ता सहावीत शिकणारा विद्यार्थी कु.रेवण अनंत राऊळ या विद्यार्थ्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत असून खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले आहे.
कु.रेवण राऊळ हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला असून त्याची निवड इस्रो दौऱ्यासाठी झाली आहे. युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचे हे सातवे वर्ष आहे.या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, पदक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते नुकतेच गौरवण्यात आले. तर या स्पर्धेतील इयत्ता चौथी ते सातवीतील टॉप फाईव्ह विद्यार्थ्यांना विमानाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे भेटीसाठी नेण्यात येणार आहे
सदर योजनेत कुमार रेवण राऊळ चे नाव समाविष्ट झाले आहे. अनेक शालेय व सहशालेय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या रेवणचे समाजातील शिक्षण प्रेमीनी कौतुक केले आहे. रेवणच्या या यशाबद्दल त्याचे शेठ न म विद्यालयाचे मुख्याध्यापक सानप, पर्यवेक्षक राऊत, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्था अध्यक्ष माननीय प्रवीण लोकरे व सर्व विश्वस्तांनी त्याचे शाळेच्या वतीने सत्कार व अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.














