नडगिवे बौद्धवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याची झाली दुर्दशा

राजकरण्यासह प्रशासनाचेही दुर्लक्ष

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावातील मागासवर्गीय वस्ती असणाऱ्या बौध्दवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याची सद्या दुर्दशा झाली असून येथील नागरिकांना प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागत आहे.मात्र स्थानिक राजकारणी व प्रशासणाच्या ही बाब निदर्शन वेळोवेळी निदर्शनास आणून देखील त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत नुकतेच नडगिवे बौद्धवाडी येथील कार्यकर्ते मोहन पगारे व किर्तिकांत जाधव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आमच्या येथील बौद्ध वस्तीवर विकास कामांच्या संदर्भात नेहमीच सापत्नक पणाची वागणूक दिली जात असून शासनाच्या अनु.जाती वर्गासाठी असलेल्या समाज कल्याण विकास निधी व्यतिरिक्त या वस्तीवर कोणताच विकास निधी येथील मागासवर्गीय वस्तीवर प्रशासन व राजकरण्याकडून खर्च केला जात नसल्याचा आरोप देखील बौद्ध समाजाचे कार्यकर्ते श्री मोहन पगारे यांनी केला आहे.

सद्या नडगिवे पोखर धोंड ते बौद्धवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून अर्धवट स्थितीत अर्धाच रस्ता मागील काही वर्षांपूर्वी खडीकरण व डांबरीकरण करून देण्यात आला होता.तर उर्वरित रस्ता तसाच सोडून देण्यात आला.त्यामुळे खडीकरण व डांबरीकरण केलेला रस्ता तर ठिकाणी खड्डे पडून तर बाद झालाच त्यापेक्षा कतीतरी पटीने उर्वरित मातीचा रस्ता धोकादायक झाला असून दुचाकी वाहने व रिक्षा तसेच चार चाकी वाहनांना वाहन चालवताना कसरत करून वाहने चालवावी लागत आहे. तसेच एखादा आजारी रुग्ण तसेच वृद्ध प्रवशाना वाहनातून ने आण करताना आदळ आपट होऊन धक्के सहन करावे लागत आहेत.

याबरोबरच स्थानिक ग्रामपंचायतच्या वतीने गावात राबविण्यात येत असलेल्या जल जीवन मिशन कामात देखील जाणून बुजून येथील बौद्ध वस्तीला डावलून कामात इतर कामे प्राधन्याने घेत बौद्धवाडीतील काम दिरंगाईने व उशिराने केले जात असल्याचे देखील मोहन पगारे यांनी सांगितले. तसेच येथील बौद्धवाडी साठी पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र बोअरवेल मंजूर झाली असून त्या बोअरवेलचे काम देखील अद्याप करण्यात आलेले नाही. जर प्रशासनाने सदर कामांबाबत तातडीने कार्यवाही न केल्यास होऊ घातलेल्या सध्याच्या लोकसभेच्या निवडणूक मतदानावर बौद्ध वस्तीतील नागरिक सामूहिक बहिष्कार घालून मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा श्री मोहन पगारे व कीर्ती जाधव यांनी सामूहिक दिला आहे.

error: Content is protected !!