कणकवली (प्रतिनिधी) : असलदे बौद्धवाडी येथील अनंत सखाराम तांबे (६२) यांनी घरा लागत असलेल्या गुरांच्या गोठ्यामध्ये लाकडी बाराला नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची खबर त्यांच्या मुलगा पवन अनंत तांबे याने कणकवली पोलीस ठाण्यात दिली होती.
पवन याने दिलेल्या खबरीत म्हटले आहे की मी व आई दुपारी २ वाजता जेवण करण्यासाठी बसलो होतो. त्यावेळी वडील अनंत तांबे हे घरी आले. त्यांना जेवण करा असे विचारले असता त्यांनी थोड्यावेळाने करतो असे सांगून बाहेर गेले. काही वेळाने आई वडिलांना बोलवण्यासाठी गेली असता तिला वडील अनंत तांबे हे घराशेजारी असणाऱ्या उघड्या गुरांच्या गोठ्यामध्ये लाकडी बाराला लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. आईने आरडाओरड केल्याने मी बाहेर गेलो. त्यानंतर वडिलांना गळफासावरून काढून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून अनंत तांबे यांना मृत्य घोषित केले, असे म्हटले आहे. अनंत तांबे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई ,नातवंडे असा परिवार आहे. अनंत तांबे हे असलदे सोसायटी चे विद्यमान संचालक म्हणून कार्यरत होते. अनंत तांबे यांच्या निधनाने असलदे गावात हळहळ व्यक्त होत आहे.











