संदिप परब म्हणजे मी पाहिलेला देव माणूस – अजित पितळे, अध्यक्ष – कोकणकट्टा संस्था

आर्य मेलडिज संस्थेकडून सामाजिक कार्यकर्ते संदिप परब व अजित पितळे यांच्या कार्याचा गौरव

यादों का कारवाँ. या कलावंतानी स्वरबध्द केलेल्या गाण्यांच्या कार्यक्रमाने श्रोते झाले मंत्रमुग्ध

खारेपाटण (प्रतिनिधी) : रस्त्यावरच्या निराधार वंचित बांधवांच्या जख्मांतील किडे काढून त्यांची सेवा सुश्रुषा करणारे संदिप परब म्हणजे मी पाहिलेला देव माणूस आहे. असे प्रतिपादन कोकणकट्टा संस्थेचे अध्यक्ष अजित पितळे यांनी बोरिवली, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘यादोंका करावा’ या कार्यक्रमात बोलताना केले. आर्य मेलडिज या संस्थेच्या वतीने नुकतेच जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब आणि विलेपार्ले येथील कोकणकट्टा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजितदादा पितळे यांना सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ प्रदान करून गौरविण्यात आले. त्यावेळी कार्यक्रम प्रसंगी अजित पितळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी आर्य मेलडिज संस्थेच्या वतीने संदीप पवार व विनोद गावंड यांचे हस्ते बोरिवली येथे त्यांनी आयोजित केलेल्या यादों का कारवाँ, या सांस्कृतिक कार्यक्रमा दरम्यान सामान्यांतील असामान्य अशा या व्यक्तींना त्यांच्या सामाजिक कार्य कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. जीवन आनंद संस्था रस्त्यावरील निराधार वंचित नागरिकांना माणूसकीचे सन्मानजन्य जीवन मिळण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या, सांताक्रुज (मुंबई), विरारफाटा (पालघर), कुडाळ (सिंधुदुर्ग) सह गोव्यातील आश्रमांत देशाच्या विविध राज्यांतील असलेल्या व पोलीस आणि संवेदनशील नागरिकांद्वारा दाखल झालेल्या २४० हून अधिक निराधार, वंचित, वयोवृध्द, शारिरीक व मानसिक आजारी बांधवांची सर्वोतोपरी सेवा केली जात आहे. संस्थेच्या आश्रमांद्वारे आजवर देशभरातील ४५० हून अधिक मनोरूग्ण बांधवांचे कुटुंब पुनर्मिलन करण्यात आले. अजित पितळे हे त्यांच्या कोकणकट्टा संस्थेच्या आणि सहकारींच्या माध्यमातून समाजातील वंचितासाठी कार्य करणा-या संस्थाना सक्रीयपणे मोलाचे सहाय्य करीत असतात.

समाजातील वंचित घटकांसाठी आर्य मेलडीज संस्था कार्यरत आहे. या संस्थेने कोरोना प्रादुर्भावाच्या काळात समाजाचे मनोरंजन करणा-या कलावंताना मुलांचे शिक्षण, आजारपण व इतर समस्यांनी ते गांजलेले असताना त्यांना मदतीचा हात दिला. त्याच प्रमाणे आदिवासी पाड्यांतील शिक्षणा पासून वंचित बालकांसाठीही कार्य केले आहे. जीवन आनंद संस्था आणि कोकण कट्टा संस्थेचे सभासद पदाधिकारी व कार्यकारी टिमने संदिप परब आणि अजित पितळे यांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!