साने गुरुजी कथामाला मालवणच्या कथाकथन स्पर्धेचे विषय जाहीर !

श्यामची आई, समाज सुधारक, अंधश्रद्धा निर्मूलन कथानां प्राधान्य

आचरा (प्रतिनिधी) : साने गुरुजी कथामाला मालवण आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरे मालवण तालुक्यात प्रतिवर्षी शाळास्तर, केंद्रस्तर आणि तालुकास्तर भव्य कथाकथन स्पर्धा आयोजित करते. यावर्षी स्पर्धाचे विषय जाहीर झाले असून अंतिम कथाकथन स्पर्धा 20 नोव्हेंबर 2024 रोजी प.पूज्य प्रकाशभाई मोहाडीकर कथानगरी आचरे येथे होणार आहे.

कथांचे विषय
१) गट अ – इयत्ता ३री, ४थी – कथा प्रकार – जीवन कथा
कथा विश्लेषण- साने गुरुजींचे जीवन प्रसंग निवेदक स्वतः सांगत आहे. किमान ते कमाल वेळ- ३ ते ४ मिनिटे.
२) गट ब – इयत्ता ५वी,६वी – कथा प्रकार – चरित्र प्रसंग कथा
कथा विश्लेषण – दहा पैकी एका समाजसुधारकांच्या जीवनकार्यातील प्रसंग कथा किमान ते कमाल वेळ – ४ ते ५ मिनिटे.
३) गट क – इयत्ता ७वी,८वी – कथा प्रकार – संस्कार कथा
कथा विश्लेषण – अंधश्रद्धा निर्मूलन – ज्या कथेचे तात्पर्य अंधश्रद्धा निर्मूलन करणारे असेल अशी कथा. किमान ते कमाल वेळ – ५ ते ६ मिनिटे.

कथा विषयांसंबंधी मार्गदर्शक टीप
गट अ- जीवन कथा – साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकातील ४२ रात्रींपैकी कोणतीही एक रात्र निवेदकाने स्वतः कथनीय करून सांगायची आहे. जशीच्या तशी नको ती त्या वेळेत बसविणे.
गट ब- चरित्र प्रसंग कथा – १) प.पू आप्पासाहेब पटवर्धन, २) नरेंद्र दाभोलकर, ३) डॉ अभय बंग, ४) डॉ .राणी बंग, ५) डॉ. प्रकाश आमटे, ६) डॉ. मंदाकिनी आमटे, ७) सिंधुताई सकपाळ, ८) समाजसेवक विनायक दामोदर सावरकर, ९) अण्णाभाऊ साठे, १०) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या दहा समाज सुधारकांपैकी एका समाजसुधारकांच्या जीवन कार्यातील प्रसंग कथा.
गट क- संस्कार कथा – अंधश्रद्धा निर्मूलन – ज्या कथेचे तात्पर्य अंधश्रद्धा निर्मूलन करणारे असेल अशी कथा; त्यातून लोकांचे प्रबोधन होईल

टीप – वरील तिन्ही गटातील कथा आपणास तयार मिळणार नाहीत. शोध घेऊन त्या कथेवर कथनीय संस्कार करून वेळेचे नियोजन पाळून कथा तयार कराव्याच लागतील.

कथा विषयांसंबंधी यापेक्षा अधिक माहिती हवी असल्यास रामचंद्र एकनाथ कुबल (9420210811) तसेच सुगंधा केदार गुरव (9420078519) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मालवण तालुका कथामालेचे कार्यवाह सुगंधा केदार गुरव यांनी केले आहे.

मालवण तालुका कथामालेची सभा नुकतीच सुरेंद्र सकपाळ उपाध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सदर सभेला रामचंद्र कुबल. परशुराम गुरव, सायली परब, संजय परब, कामिनी ढेकणे, अमृता मांजरेकर, भवन मांजरेकर, मनाली फाटक आणि मार्गदर्शक म्हणून सुरेश ठाकूर उपस्थितीत होते.

error: Content is protected !!