स्वखर्चाने खडी पसरवून एसटी फेरीचा मार्ग केला मोकळा
सत्ताधारी बेनामी ठेकदारीत गुंग ; उत्तम लोके यांची टीका
कणकवली (प्रतिनिधी) : दारिस्ते गावातील मुख्य रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे एसटी बस परतण्यासाठीची जागा पूर्णतः चिखलमय झाली आहे. एसटी रुतून बसण्याच्या धोक्यामुळे गावातील एसटी बसफेरी रद्द करण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायत ने पाऊल न उचलल्यामुळे युवासेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी ग्रामस्थांच्या मागणीची तात्काळ दखल घेत स्वखर्चाने त्या जागेत खडी पसरवून एसटी परतण्यायोग्य जागा बनवून घेतली. यावेळी उत्तम लोके यांच्यासह लवू पवार, मनोज बागवे, मदन बागवे, विजय गावकर, बबन गावकर उपस्थित होते. याबाबत बोलताना उत्तम लोके म्हणाले की, दारिस्ते गावातील मुख्य रस्त्याचे काम पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून उन्हाळ्यापासून सुरू आहे. पावसाळ्यात एसटी वाहतूक योग्य रस्ता बनवणे ही संबंधित ठेकेदाराची जबाबदारी होती. मात्र ठेकेदारा बेजबाबदार पणामुळे आणि ग्रामपंचायत च्या भोंगळ कारभारामुळे गावातील एसटी बसफेरी बंद झाली.
दारिस्तेच्या गावडेवाडी येथे एसटी बस परतण्यासाठीची जागा चिखलमय झाल्यामुळे गावात एसटी बस फेरी बंद होती. त्यामुळे गावातील रहिवासी प्रवासी आणि शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत होते.याकडे ग्रामपंचायत मध्ये अनेकदा दाद मागूनही सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले. दारिस्ते गाव केवळ निवडणुकीपुरता सत्ताधाऱ्यांना दिसतो. माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत आणि त्यांच्या कार्यकर्त्यानी ग्रामस्थांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले. बेनामी ठेकदारीतून पैसे मिळवणे हाच सत्ताधाऱ्यांचा अजेंडा आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ह्यामध्ये सर्वसामान्य ग्रामस्थांचे हाल होत आहेत अशी टीका लोके यांनी केली. दारिस्ते मधील ग्रामस्थांनी युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांच्या कानी बंद एसटी फेरी ची समस्या घातल्यावर लागलीच उत्तम लोके यांनी स्वखर्चाने चिखल झालेल्या भागात खडी पसरवून दिली. त्यामुळे दारिस्ते गावातील एसटी फेरी पूर्ववत सुरू होणार आहे. उत्तम लोके यांनी ग्रामस्थांची अडचण लक्षात घेत तात्काळ पदरमोड करत गैरसोय दूर केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.











